Breaking
देश-विदेशमहाराष्ट्र

देशातील सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प : मंत्री छगन भुजबळ

0 0 9 8 4 7

नाशिक (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सरकारमधील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण, विद्यार्थी, उद्योजक यांच्यासह सर्वच घटकांचा विचार करून योजना आखलेला, सर्व घटकांना मदत करणारा सर्वसमावेश अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सरकारमधील अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याबाबत त्यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशातील अन्नाच्या समस्या दूर करत देशातील सुमारे ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न, धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी देखील सुरु आहे. देशातील गोरगरीब नागरिकांना २ कोटी घरे बांधण्यात येणार आहे. सौर ऊर्जा योजनेद्वारे १ कोटी घरांना ३०० युनिट पर्यंत वीज माफ करण्यात येणार आहे. पीएम आवास योजनेतील ७० टक्के घर ही महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संसदेत महिलांना आरक्षण देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे. देशातील ३ कोटी महिलांना लखपती बनविण्यासाठी योजना आखल्या जात आहे, ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः देशांतील बहुतांश राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे. त्यादृष्टीने मत्स व्यवसायाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीएमकिसान योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. शेतीसाठी आधुनिक साठवणूक केंद्र उभारण्यासह पुरवठा साखळीवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेलबिया लागवडीला प्रोत्साहन देत दुध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांना या निर्णयांचा मोठा फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की देशातील संरक्षण क्षेत्रासाठी देखील भरीव अशी तरतूद करण्यात आली असून १ हजार फायटर विमाने निर्माण करण्यात येणार आहे. देशाअंतर्गत विमान सेवेला चालना देण्यासाठी ५०० पेक्षा जास्त विमानमार्ग विकसित करण्यात येणार आहे. शहरांमध्ये मेट्रो रेल्वेला चालना देत ४० हजार वंदे भारत कोच निर्मिती करण्यात येणार येऊन ३ मोठे रेल्वे कॉरीडॉर विकसित करण्यात येणार आहे. यामुळे देशाच्या विकासाला अधिक चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.

तसेच देशात १५ एम्स रुग्णालय विकसित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विकसित करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णालयामध्ये देखील वाढ होऊन चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यासाठी ३ हजार तंत्रशिक्षण महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे.

उद्योग क्षेत्रामध्ये फूड प्रोसिसिंग युनिटला अधिक चालना देण्याची घोषणा अतिशय महत्वपूर्ण आहे. पर्यटन वाढीसाठी विविध योजना आखल्या जात आहे. इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी सवलत देण्यात आली आहे. तसेच २२ टक्के कोर्पोरेट कर कमी करण्याच्या निर्णय उद्योग क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांना ७ लाखांपर्यंत करसवल देण्यात आली असून केंद्र सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी सर्वसमावेश असा अर्थसंकल्प असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे