येवला (प्रतिनिधी) : पिण्यासाठी पाणी मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील दुगलगाव, देवळाणे येथील ग्रामस्थांनी बुधवारी, (दि. १०) सकाळी साडे अकरा वाजता कोळगंगा नदीच्या कोरड्या पत्रात बसून ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यातील देवळाणे, बोकटे, दुगलगाव या गावांमध्ये वाढत्या उन्हाबरोबरच माणसांच्या आणि जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोकटे यात्रा निमित्ताने येणारे पाण्याचे रोटेशन कोळगंगा नदीला बंधारे भरण्यासाठी सोडले असताना बोकटे गावाच्या वेशीवरच पाणी बंद केले. त्यामुळे देवळाणे व दुगलगाव ही गावे तहानलेलीच राहिली. या प्रकरणी चौकशी करून तात्काळ पाणी द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
बोकटे यात्रेला पिण्याच्या पाण्याचे विशेष रोटेशन देण्यात येते. मात्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे कारण देत पाटबंधारे विभागाने पाणी वाटपात देवळाने, दुगलगाव येथील काही बंधाऱ्यांचे आरक्षण हटवले गेले असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
सदर आंदोलनात रावसाहेब लासुरे, सोमनाथ हरीचंद्रे, भिकाजी निकम, लक्षण कोटमे, सखाहरी लासुरे, वाल्मीक काळे, चांगदेव मोरे, राजू पठाण, चांगदेव मोरे, गणेश कोटमे, विक्रम म्हस्के आदींसह ग्रामस्थ सहभागी होते.