येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांचा विजयी ‘पंच’
विकास अस्त्राला लाडक्या बहिणींची साथ

येवला (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात लक्षवेधी लढत म्हणून पाहिल्या जाणार्या येवला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे हेवीवेट नेते मंत्री छगन भुजबळ पाचव्यांदा विजयी झाले आहेत. भुजबळ यांनी प्रतीस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अॅड. माणिकराव शिंदे यांचा 26 हजार 400 मतांनी पराभव केला. मंत्री भुजबळ यांना 1 लाख 35 हजार 23 तर अॅड. शिंदे यांना 1 लाख 8 हजार 623 मते मिळाली.
सकाळी 8 वाजता अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर गोदामात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली. येवला विधानसभा मतदारसंघात 2 लाख 49 हजार 200 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने विक्रमी 76.30 टक्के मतदान झाले होते. यात मतमोजणीत टपाली व इतर मतदानाची भर पडल्याने एकूण 2 लाख 50 हजार 835 मतदान झाले. पहिल्या फेरीत अॅड. शिंदे यांनी 105 मतांची तर दुसर्या फेरीत 1 हजार 323 मतांची आघाडी घेतली. मात्र तिसर्या फेरीनंतर मंत्री भुजबळ यांनी 83 मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत 2 हजार 990, पाचव्या फेरीत 4 हजार 471, सहाव्या फेरीत 6 हजार 886, सातव्या फेरीत 8 हजार 589, आठव्या फेरीत 8 हजार 27, नवव्या फेरीत 8 हजार 916, दहाव्या फेरीत 11 हजार 200, अकराव्या फेरीत 12 हजार 802, बाराव्या फेरीत 10 हजार 989 अशी मंत्री भुजबळ यांची आघाडी वाढत गेली. दुपारी साडे चार वाजता अंतीम निकाल जाहिर झाला. मतमोजणी दरम्यान कडेकोट बंदोबस्त होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांची विजयाकडे वाटचाल दिसून येताच भुजबळ समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष सुरू केला. भुजबळ यांच्या सपंर्क कार्यालयावर मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले होते. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल- ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण करत समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. तर शहरातही ठिकठिकाणी भुजबळ यांच्या विजयाचा डीजेच्या दणदणाटात गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
विकास अस्त्राला लाडक्या बहिणींची साथ
विधानसभा निवडणूक जाहिर झाल्यापासून येवला मतदारसंघ या ना त्या कारणाने महाराष्ट्रभर चर्चेत राहिला. येवला मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी, मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य करत अॅड. माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देवून मराठा कार्ड खेळले. याबरोबरच स्वत: पवार यांनी येवला मतदारसंघात सभा घेवून भुजबळांवर जोरदार टीका करत फसवणार्यांना घरी बसवा, असे आवाहन केले होते. पवार यांच्या यासभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच अंतीम टप्प्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सात्वंन दौर्याच्या निमित्ताने मतदारसंघातील काही प्रमुख गावांना भेटी देत आरक्षणाला आडवे येणार्यांना पाडा, असे आवाहन केले होते. जरांगे यांच्या या दौर्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. पवारांची सभा आणि जरांगेचा दौरा गेमचेंजर ठरणार असे वाटत होते. मराठा विरूध्द ओबीसी असा रंगच या निवडणूकीला आला. त्यात महाविकास आघाडीकडून, भुजबळ महायुतीत भाजपाबरोबर असल्याचे सांगत दलित, मुस्लीम मते आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात होता. मतदारसंघातील बहुसंख्य मराठा मते व दलित, आदीवासी, मुस्लीम मतांची भरपडल्यास अॅड. शिंदे यांचा विजय होणार असल्याची गणिते मांडल्या गेली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात भुजबळ यांनी मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावत विकासअस्त्राचा प्रभावी वापर केला. मराठा आरक्षण मुद्याने निर्माण झालेली लाट आणि त्या विरोधात सुप्तपणे चाललेली इतर मागासांची लाट, महायुतीच्या कल्याणकारी व लाडकी बहिण योजना यामुळे मंत्री भुजबळ यांचा विजय झाला. भुजबळांच्या या विजयामागे मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी डे टुडे लक्ष देवून केलेले नियोजनही तितकेच महत्वाचे ठरले आहे.
भुजबळ यांच्या विजयात खैरेंचा सिंहाचा वाटा
• येवला मतदारसंघात महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या विजयात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षापासून येवला मतदारसंघातील विकासकामे तसेच जनतेच्या दैनंदिन समस्यांचा निपटारा करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यापासून खैरे यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचा हा विजय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सर्वांना सोबत घेवून जाण्याच्या खैरे यांच्या भूमिके मुळे भुजबळ समर्थकांचे मोठे जाळे येवला मतदारसंघात निर्माण झाले. भुजबळ यांच्या माध्यमातून होत असलेला विकास गावागावात पोहोचविण्याचे काम खैरे यांनी केले. समीर भुजबळ नांदगावमधून निवडणूक लढवत असल्यामुळे मनुष्यबळाची विभागणी झाली मात्र, खैरे यांच्या संघटन कौशल्यामुळे येवल्यातील रणनिती यशस्वी ठरली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून निवडणुकीच्या पूर्वतयारीची मोर्चेबांधणी खैरे यांनी केली होती. बारा हजार शिधाधारकांना धान्य सुरू करण्यात आले. आदिवासी बांधवांना रेशन कार्ड, जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी संपर्क कार्यालयातून मोफत यंत्रणा उभी करण्यात आली. लाडकी बहिण योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष शिबिरे घेवून मोहीम राबविण्यात आली. या बरोबरच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केले गेलेले प्रयत्न या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. गावोगाव दौरे करत बेरजेचे राजकारणही खैरे यांनी केले. ऐन निवडणुकीत प्रचारयंत्रणा प्रभावी राहण्यासाठी खैरे यांनी मोठी मेहनत घेतली. त्यामुळे भुजबळ यांच्या विजयात खैरे यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितल्या जात आहे.