आमदार दराडेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे ११० शिक्षकांचे प्रस्तावांना मंजुरी
पुणे येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन

येवला (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रातील शेकडो शिक्षकांच्या प्रलंबित प्रस्तावांना पुणे येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून लालफितीचा रस्ता दाखविण्यात आल्याने संतप्त झालेल्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पुणे येथे थेट रास्ता रोको आंदोलन करून आक्रमक पावित्रा घेतल्याने शिक्षण विभागाचे धाबे दणाणले. या आंदोलनामुळे ११० जणांचे अनुकंपा मान्यता, शालार्थ आदेश, अर्धवेळ मान्यता, पूर्णवेळ मान्यता, प्राचार्य मान्यता, निवड श्रेणी प्रकरणे व शालार्थ प्रकरनांना मंजूरी मिळत चालना मिळाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर या पाचही जिल्ह्यांतील शेकडो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे शालार्थ आयडी, वैद्यकीय देयके, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती, सेवा सातत्य, अर्धवेळ मान्यता अशा शेकडो प्रस्तावांचे भिजत घोंगडे पडलेले होते.शिक्षकांना गेल्या वर्षानुवर्षे पुणे येथे शिक्षण विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. मात्र शिक्षण विभागातील अधिकारी या शिक्षकांना केवळ आश्वासनांवर बोळवण करीत होते. यात नगर जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. या जिल्ह्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे असल्याने गुरुवारी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांच्या कार्यालयात धडक देत प्रल्नाबित मागण्यांबाबत विचारणा केली असता त्यांना उपस्थित अधिका-यांनी थातुरमातुर उत्तरे दिल्याने आक्रमक झालेल्या शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी कडक उन्हात शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून रास्तारोको केला.या रास्ता रोको आंदोलनात उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव, एस . बी. देशमुख (नाशिक), संभाजी पाटील (जळगाव), आप्पा शिंदे (नगर), वैभव सांगळे, प्रकाश हिंगे (राहुरी), बी. बी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षक सहभागी झाले. यावेळी रास्ता रोको करणा-या शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी आमदार किशोर दराडे यांना आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केले. परंतु दराडे यांनी पोलिसांचे आवाहन धुडकावल्याने अखेर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी आंदोलनस्थळी येत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत आमदार किशोर दराडे यांनी रास्ता रोको करताच प्रथम पोलीसांमार्फत रास्ता रोको उधळण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. मात्र यात अपयश आल्याने अखेर वठणीवर आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी रस्त्यावर धाव घेत आमदार किशोर दराडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दराडे यांनी उपस्थित अधिका-यांना चांगलेच धारेवर धरल्याने अखेर दराडे यांच्या सर्व मागण्या मान्य करून सायंकाळी उशिरापर्यंत तब्बल ११० शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांच्या फाईल मंजूर करून त्यांच्या हाती सोपविण्यात आल्या.
शिक्षकांचे अनेक प्रश्न रखडून ठेवले जातात. अनेकदा मागणी करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे आंदोलन केले.आजच्या आंदोलनामुळे २५ अनुकंपा मान्यता,३५ शालार्थ आदेश,८ अर्धवेळ मान्यता, ६ पूर्णवेळ मान्यता,२२ प्राचार्य मान्यता,८ निवड श्रेणी प्रकरणे व ५२ शालार्थ प्रकरणे वरिष्ठ कार्यलय येथे पाठवण्यात आले. शिक्षकांचे रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले असून जागेवर त्यांना मान्यता व मंजुरी पत्रे मिळाली.
– किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग