शिक्षक मतदारसंघात आदिवासी विकास विभागातील शिक्षक संघटना महत्वाची भूमिका पार पाडणार
- संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड

नाशिक (प्रतिनिधी) : शिक्षक मतदारसंघात आदिवासी विकास विभागातील शिक्षक संघटना महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे
महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अन्यायाच्या विरोधातील लढाई काय परिणाम घडवून आणू शकते हे आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे आणि आत्ता शिक्षकांना शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीची झलक दाखवून देईल. या साठीच आम्ही प्रथमच आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्याची रखमाजी भड यांची उमेदवारी या निवडणुकीत करीत आहोत. या करिता काही प्रमुख भूमिका आम्ही जाहीरनाम्यात मांडणार आहोत, असेही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून शिक्षक संघटना निष्प्रभ झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात शिक्षकांची कमालीची अवहेलना होत असतांना मात्र विधान परिषदेत शिक्षकांच्या संवेदना मांडल्या जात नाही आणि शिक्षक आमदार राज्याच्या आणि देशाच्या शैक्षणिक धोरणावर अवाक्षर देखील काढायला तयार नाही. शेतावर किंवा रोजगार हमी कामावर काम करणाऱ्या व्यक्तीला उपजीविकेसाठी किमान काहीतरी वेतन तरी मिळते पण शिक्षकांना दहा ते पंधरा वर्षे विना वेतन गुलामी करावी लागते. शासनाच्या शिक्षणाच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेला विकलांग अवस्था आली आहे. ज्या समाज घटकाने देशाची नवी पिढी घडवायची त्यांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ करून टाकणाऱ्या या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात या निवडणुकीत चर्चा झालीच पाहिजे, असेही गायकवाड यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.
शिक्षक मतदारसंघ म्हणजे संस्थाचालकांचे आणि धनदांडग्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची व्यवस्था झाली आहे. यामुळेच शिक्षक चळवळीत अनेकवर्षे काम करूनही शिक्षकांना मोकळा श्वास घेता येत नाही आणि ऐन निवडणुकीत दबाव तंत्राचा वापर करून त्यांच्या संघटना फोडल्या जातात. याला विरोध केला पाहिजे आणि शिक्षकांचा आत्मसन्मान जागृत करण्याची हीच वेळ आहे. खोट्या पैठणी साड्या आणि त्या बरोबर पैशांचे पाकिटे घेऊन स्वतःच्या भवितव्याची होळी करणार की शिक्षक म्हणून शिल्लक राहिलेला स्वभिमान या निवडणुकीत जागृत ठेऊन या चळवळीचे अस्तित्व सिध्द करणार हे ठरवावेच लागेल, असेही गायकवाड म्हणाले.
शिक्षकांची लायकी तपासणाऱ्या मंत्र्यांना आदिवासी विकास विभागातील शिक्षकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, असेही एका प्रश्नावर गायकवाड म्हणाले. या प्रसंगी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.