आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकिय
भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सत्यशोधक विचार प्रवाह अंगिकारावा लागेल : डॉ. उमेश बगाडे
प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील व प्रा. कॉ. रणजित परदेशी यांना अभिवादन

0
0
9
8
4
4
मालेगाव (प्रतिनिधी) : नव्या भांडवली धोरणांमुळे अर्थिक सामाजिक लुटीचे स्वरुप बदलले असुन ते आधिक तिव्र व जाचक झाले आहे. कमीतकमी मोबदला व अधिकाधिक शोषण अशी पिळवणूक सुरू आहे. स्रीदास्य, जात, वर्गीय शोषण अधिक तिव्र व गुंतागुंतीचे बनवले जात आहे. व्यवसायाच्या जातिबद्ध मर्यादा नव्या पिढीला शोषणाच्या खाईत ढकलत आहे. भविष्यातील सर्वच स्तरावरील या धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सत्यशोधक विचार प्रवाह अंगिकारावा लागेल, असे प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत डॉ. उमेश बगाडे यांनी केले.
मालेगाव येथील सत्यशोधक मैदान येथे आयोजित प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी व प्रा. कॉ. रणजित परदेशी स्मृती दिनानिमित्त आयोजित जागर प्रबोधनाचा कार्यक्रमात ‘जातीचे अर्थशास्त्र’ या विषयावर डॉ. बगाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कॉ. अशोक परदेशी तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. दिलीप कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी विलास जोगदंड व विनोद खरात यांच्या हलगी वादनात कॉ. शरद पाटील, प्रा. कॉ. रणजित परदेशी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. शाहीर प्रकाश वाघ, शिरपुरचे ज्वाला मोरे यांच्या पथकाने क्रांतीगीते सादर करत उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण केली.

जातीव्यवस्था व भांडवलशाही तुम्हाला करार पध्दतीने वेठबिगार बनवत आहे. पारंपारीक जातीधारीत कामे परंपरेची वेश ओलांडून पुढे जात नाही. शोषणाच्या नवनवीन योजना तयार करुन तुम्हाला व्यवस्थेच्या चरख्यात पिळले जात आहे. शेतकऱ्याला आजही शेतमालाच्या सौदेबाजीचा अधिकार येथील जातीव्यवस्था देत नाही परिणामी शेतकरी हा व्यवस्थेच्या वरवंट्याखाली भरडला जात आहे. पारंपरिक चौकट मोडू शकेल व स्वत:ला समृध्द बनवु शकेल असे अवकाश निर्माण होवुच दिले जात नाही. गुलामीच्या श्रृंखला तोडूच नये अशा पध्दतीची पद्धतशीर रचना शोषक वर्गाने उभी केली केली आहे. यासाठी वर्ण व जातव्यवस्था आजही जोरदारपणे काम करत असल्याने शोषित वंचित घटकांचे संघटन व प्रबोधन ही काळाची गरज असल्याचे डॉ. बगाडे यांनी यावेळी सांगितले.
दुसऱ्या सत्रात भारतीय शिक्षण व्यवस्था व रोजगाराचे प्रश्न या विषयावर बोलताना प्रा. श्रीकांत काळोखे यांनी, कनिष्ठ जातीवर्गाला शिक्षण व्यवस्थेतुन हद्दपार करण्याचा खुला कार्यक्रम शोषणव्यवस्थेकडून सुरू आहे. आरटीई सारख्या वरवर गोड वाटणाऱ्या योजना शिक्षणाच्या खाजगीकरणाला व बाजारीकरणाला खुलेआम पाठिंबा देत आहेत. शाळाबाह्य पिढी निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, मराठी शाळा बंद पाडल्या जाणे व खाजगी शाळांना समर्थित करणे याचाच अर्थ जातिव्यवस्थेच्या उतरंड व्यवस्थेप्रमाणे कनिष्ठ जातवर्गीयांना शिक्षणबाह्य व अंगठेबहाद्दर बनविण्याची नवि चलाखी सुरू असल्याचे परखड मत मांडले.
युरोपियन देशांच्या शैक्षणिक धोरणांचा आणि भारतीय शैक्षणिक धोरणांचा वैचारिक विरोधाभास ठळकपणे दिसून येतो. शैक्षणिक धोरणांची ही दरी विचारात घेता भारतीय शिक्षण व्यवस्था कुचकामी ठरत आहे, व वरीष्ठ जातीवर्गाला झुकते माप तर कनिष्ठ जातीवर्गाला नाडण्याचे पध्दतशीर काम करीत असल्याचे प्रा. काळोखे यांनी यावेळी नमूद केले.
प्रश्नोत्तराच्या सत्रात कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना वक्त्यांनी उत्तरे दिली. कॉ. अशोक परदेशी, राजेंद्र भोसले, सुभाष परदेशी, ॲड. दिलीप कुलकर्णी, मंगला गोसावी, सिद्धार्थ जगदेव, युवराज बावा यांनी मनोगत व्यक्त करतांना पुन्हा एकदा क्रांतीचा नारा बुलंद करण्याचे आवाहन केले. समारोप प्रसंगी प्रवीण पानपाटील, सिद्धांत बागुल, आशिष मोरे, शंकर पवार, सांची चित्ते यांनी प्रबोधन गीते सादर केली.
कार्यक्रमास कॉ. भगवान चित्ते, विक्रम गायकवाड, रोहिणी चित्ते, गोकुळ वाणी, युनुसभाई शेख, दत्ता जाधव, आमित तिसगे, रामदास पगारे, विनोद चौधरी, बाबूलाल पडवळ, सोमनाथ वडगे, उमेश अहमद, बाबूलाल जाधव, अनिल पाटील, शैलेंद्र परदेशी, राकेश माळी, अमित सरक, भिला महाजन, नितीन संसारे, योगेंद्र वाघ, ऐश्वर्या चित्ते, आनंद चित्ते, प्रविण अहिरे, धम्मानंद सोनकांबळे, रामचंद्र वाव्हळ आदीसह उत्तर महाराष्ट्रातील सत्यशोधक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यशोधक युवा सभा, सम्राट मंडळ, साथी प्रतिष्ठान, अंनिस यांचेसह पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0
0
9
8
4
4