येवल्यात शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा थाळीनाद मोर्चा
मंत्री भुजबळांसह तहसीलदारांना निवेदन

येवला (प्रतिनिधी) : वर्तमान एकात्मता फाऊंडेशन संचालित कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी तहसिल कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला.
वर्तमान एकात्मता फाऊंडेशन संचालित कष्टकरी कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष शरद लोहकरे, राष्ट्रिय महिला अध्यक्ष शारदा लोहकरे, राज्य समन्वयक डॉ. हरिश्चंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब सोमासे यांच्या नेतृत्वाखाली शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी शहरातील माऊली लॉन येथून मोर्चाला सुरुवात झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात मोर्चाच्या वतीने स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा जाहीर निषध असो, हमारी मांगे पुरी करो, कष्टकरी कामगार संघटनेचा विजय असो, या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
त्यानंतर विंचूर चौफुली येथे मोर्चेकऱ्यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येवला तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी महेन्द्र पगारे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पठाण, नाशिक जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सोमासे यांची भाषणे झाली. संघटनेचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद लोहकरे यांनी बोलताना, या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला. संघटनेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासनाने इतर कर्मचाऱ्यंप्रमाणे त्यांचा विमा काढावा, या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिला जावा, ड्रेस कोड लागू करावा, किमान वेतन नुसार या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये वेतन देण्यात यावे, सदर वेतन सरळ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे, या कर्मचाऱ्यांना विनाकारण कामावरून काढू नये यासह विविध मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत. सदर मोर्च्यात नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर मोर्चा दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता