छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे २२ सप्टेंबर रोजी येवल्यात होणार जल्लोषात स्वागत
येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे २६ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

येवला, (प्रतिनिधी) : येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात येणार आहे. तसेच दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराजाच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प कारण्यात येत आहे. सुमारे साडे चार एकर जागेत २१ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ११ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात येणार आहे.
या शिवसृष्टी प्रकल्पात शिवसृष्टी प्रकल्पात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा १२ फुट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्टीत पुतळा, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्त्तीचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडीओ व्हिज्युअल हॉल, किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेले मुख्य प्रवेशद्वार, सुरेख गार्डन आणि नयनरम्य कारंजे यासह विविध कामांचा समावेश आहे.
या प्रकल्पात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे आगमन होणार आहे. या ठिकाणाहून पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर विंचूर, हनुमान नगर, भरवस फाटा, देशमाने, जळगाव नेऊर, एरंडगाव, अंगणगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अंगणगाव ते शिवसृष्टी येथे भव्य मिरवणूक काढण्यात येऊन शिवसृष्टी प्रकल्पात या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मतदारसंघातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन वसंत पवार यांनी केले आहे.