Breaking
प्रासंगिकब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियस्थानिक

आज लाडक्या बहिणींना फक्त पैसे नको, फक्त मदत नकोय, फक्त आधार नकोय तर सुरक्षा देखील पाहिजे : आदित्य ठाकरे

0 0 9 8 4 4

येवला (प्रतिनिधी) : शेतकर्‍याला मदत द्या, अशी आपण मागणी करत होतो, याकडे बघायला तयार नाहीयेत. पण आता नवीन कुठेतरी गाण वाजतय. माझी लाडकी बहीण लाडकी बहीण. महिलांच्या खात्यावर एक दोन हफ्त्यांचे पैसेही आले असतील. आता सगळीकडे मुख्यमंत्री सांगताहेत की जे घटनाबाह्य आहे की आम्ही सरकार आल्यानंतर वाढवून देऊ. तुम्ही विचार करा जे 2014 मध्ये 15 लाखाबद्दल बोलत होते. प्रधानमंत्री बोलले होते की 15 लाख रुपये आम्ही सगळ्यांच्या खात्यात देऊ. ते दहा वर्षानंतर आता 15 लाखावरन पंधराशेवर आलेले आहेत. यातही अटीशर्ती टाकलेल्या आहेत की, अर्ध्या महिलांच्या खात्यात पैसे येणारच नाही. निवडणुकीनंतर हे खोके सरकार तुम्हाला सांगतील पैसेच नाही. आत्ता सांगताहेत आम्ही वाढीव देऊ. मी आज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतोय तुमचं सरकार तर येतच नाही, हिम्मत असेल तर आत्ताच वाढीव 3 हजार रुपये द्या. आमच सरकार येणार आहे आणि आमच सरकार आल्यानंतर आम्ही वाढवून आमच्या बहिणीला देणार म्हणजे देणारच. पण आज लाडक्या बहिणींना फक्त पैसे नको, फक्त मदत नकोय, फक्त आधार नकोय तर सुरक्षा देखील पाहिजे आहे, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आयोजित स्वाभीमान सभा व शेतकरी मेळाव्यात युवासेना प्रमुख ठाकरे बोलत होते. मंचावर आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, वसंत गीते, संभाजी पवार, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, जयंत दिंडे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी, मतदारसंघाच्या विविध समस्या मांडल्या.

खोके सरकारच्या हाती जेव्हा सत्ता गेली, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात परिस्थिती बिघडत चालली आहे. आज एकंदर महाराष्ट्राचा आढावा घ्यायला लागलो तर सुरुवात कुठून करायची हा एक प्रश्न उपस्थित होतो. गेल्या दोन वर्षांमध्ये काय जे चांगले चालले होते जे घडत होत या खोके सरकारने बिघडवलेल आहे. आपण पुढचं जे सरकार निवडणार आहोत ते सरकार कोणाच असेल हा आता महत्त्वाचा प्रश्न ठरलेला आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर तुम्हाला वाटलं असेल झालं जिंकलो आपण. तरी लढाई संपलेली नाहीये. भाजपला या महाराष्ट्रातून हद्दपार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही लढाई आपली संपत नाही, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

काल मुंबईकडून नाशिक कडे येताना आणि आज देखील नाशिक वरून येवल्याकडे येताना प्रश्न हाच पडतो की, एवढी वर्ष सत्ता या जिल्ह्यात असताना एवढी वर्ष मंत्रीपद या जिल्ह्यात असतानाही मुंबई ते नाशिक असेल नाशिक ते येवला असेल हा रस्ता आणि अवश्यक त्या मूलभूत सुविधा अजून कशा नाहीत, जसं लोकांना अपेक्षित आहे तस का झाल नाही. एवढे वर्ष याच तालुक्यातून याच मतदारसंघातून जे मंत्री राहिलेले आहेत त्यांना कधी स्वतःच्या मंत्रिपदाबद्दल असं वाटलं नाही का, जवाबदारी वाटली नाही का किंवा आपल्या तालुक्याबद्दल आपुलकी वाटली नाही का? स्थानिक जनता किती दिवस त्या धुळीच्याच रस्त्यावरनं जाणार आहे. कधीतरी आपण कायापालट करणार आहोत का नाही? मी ऐकतोय अजूनही टँकरचा पाणी सुरू आहे. भर पावसाळ्यात अजूनही टँकर गावोगावी जात आहेत, असे म्हणत ठाकरे यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांचेवर टिका केली.

भाजपा फुटीचे राजकारण करते. महाराष्ट्रा मध्ये भांडण लावण्याचे खूप प्रयत्न होतील. कारण भाजपचे आतापर्यंतचे राजकारण हेच आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करतील. दोन धर्मांंमध्ये, मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल आपल्या आपल्यामध्ये भांडण लावणण्याचा प्रयत्न करतील. आपण एकत्र आलो पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राला, सगळ्यांना घेऊन पुढे घेऊन जायच आहे. आपल्याला लढायचं आहे ते आपल्या सर्वांसाठी. आपल्याला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर न्यायचा असेल, महाराष्ट्राला सुवर्णकाळाच्या दिशेने न्यायच असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढाई लढायला लागेल. आपल्याला न्यायासाठी लढायला लागेल, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

आयबीपीएसच्या परीक्षा आणि एमपीएससीच्या परीक्षा या एकाच दिवशी आलेल्या आहेत. देशभरात ही घटना घडली असेल पण त्या त्या राज्यांनी बदल केले. पण आपल्याच राज्या मध्ये एमपीएससीने आडमुठी भूमिका घेतलेली आहे. एमपीएस्सी ऐकायला तयार नाही बर राज्य सरकार सांगत आम्ही दखल घेतलेली आहे. पण आज जिथे पुण्यामध्ये हजारो विद्यार्थी दिवस-रात्र आंदोलन करत आहेत तिथे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीयेत. इंडिया अघाडीच्या वतीने आज पवार साहेब त्यांना भेटत आहेत. आपले युवा सेनेने पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे, पण हे सगळं होतांना देखील सत्ताधारी पक्ष कुठे आहेत, जे मंत्री आहेत, जे स्थानिक तिकडचे आमदार असतील त्या कुणालाच काही वाटत नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. पुढच्या पिढीने शेती करावी अस कुणालाच वाटत नाही. दुसरं म्हणजे प्रायव्हेट जॉब बरोबर नोकर्‍या यायला पाहिजे. आपल्या शहरांमध्ये, आपल्या गावामध्ये एमआयडीसी यायला पाहिजेत. आज मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र मध्ये तुम्ही एक तरी नवा उद्योग आलेला ऐकलाय का? एक तरी नवा रोजगार आलेला आहे का? असा सवाल करत, खोके सरकार जे आपल्या डोक्यावर बसवल गेल त्यांनी या दोन वर्षांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रात येणारा उद्योग हा गुजरातला पाठवला. महाराष्ट्रतून सगळे उद्योग गुजराथला चालले आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघतोय. न शेतीमध्ये आपण पुढे चाललोय, ना उद्योग क्षेत्रामध्ये आपण पुढे चाललोय. बट्ट्याबोळ झालेला आहे सगळा, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक कोविड काळात देखील आणली आणि आपण सुवर्णकाळ आपले उद्योग क्षेत्राला आणत होतो. नवे रोजगार आपल्या महाराष्ट्रात तयार करत होतो. उध्दव साहेबांनी आपल्याला 2019च्या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता, की जर आपलं सरकार आलं तर आपण शेतकर्‍यांना कर्जमुक्त करू आपण कर्जमाफी बोलत नाही. माफ आपण गुन्हेगाराला करतो. माझा शेतकरी बांधव गुन्हेगार नाही. आपण कर्जमुक्ती कशी केली. आणि त्यांनी एवढ्या अटी लावल्या, शर्ती लावल्या ते अजूनही सुरूच आहे. पण उद्धव साहेबांनी कोणतीही निवडणूक समोर नसताना महाराष्ट्रातल्या शेतकर्‍याला कर्जमुक्ती दिली. दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती कर्जमुक्ती आपण दोन महिन्यात करून दाखवली. दुसर्‍या बाजूला हे खोके सरकार. निर्यातबंदी कांद्यावर आणली होती आठवत ना. आता कदाचित तुमच्या गावांमध्ये येऊन सांगतील की अमुक झाला, चूक झाली. आता कधी आम्ही पुन्हा ती निर्यातबंदी येऊ देणार नाही. पण आठवा, हीच ती भाजपा आहे. हेच ते मिंधे सरकार आहे, ज्यांनी निर्यात बंदी उठवताना देखील पहिली उठवली गुजरात मधली कांद्याची निर्यातबंदी आणि त्याच्या दीड दोन महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली. का हा दुजाभाव करता महाराष्ट्र सोबत. महाराष्ट्रच का मागे ठेवता तुम्ही? मग उद्योग क्षेत्रात तुम्ही महाराष्ट्राला मागे ठेवता, कृषी क्षेत्रात महाराष्ट्राला मागे ठेवता. कुठचाही क्षेत्र घ्या तुम्ही आज महाराष्ट्राला अडवायच कस, थांबायचं कसं हा त्यांचा प्रयत्न असल्याची टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.

बदलापूर मधली तर घटना आपण पाहिलीच असेल. पोलीस स्टेशननी पाच की सहा दिवस एफआरची दखल देखील घेतली नाही. एफआयआर ची नोंद करून घेतली नाही. कोणाचा दबाव होता. कोणाची शाळा होती. ते आपटे नावाचे जे गृहस्थ भाजपचे ज्यांची शाळा आहे, कुठे आहेत ते. का नाही बोलत. भाजपवाल्याची शाळा होती, तुम्ही त्या शाळेला वाचायचा प्रयत्न करतात. आणि एका गरोदर महिलेला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये फेरे मारायला लावता. सहा सहा दिवस एफआयआर घेत नाही, बरं ज्या दिवशी तुम्ही घेतली त्या दिवशी देखील त्या गर्भवती महिलेला दहा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवल. असे भाऊ तुमचे खरोखर लाडके भाऊ होऊ शकतात का? हे असल सरकार तुमच लाडक होऊ शकत नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, जेव्हा लोक रस्त्यावर आली. रेल्वे स्टेशनवर आंदोलन झाल. ज्यांनी आंदोलन केलं त्या 300 लोकांना लगेच ताब्यात घेतल आणि त्या लोकांना आज अटक झालेली आहे. बर इथेच काही गोष्ट थांबली नाही. एक तिथे नेते आहेत स्थानिक वामन म्हात्रे नावाचे. एक महिला पत्रकार ती तिथे रिपोर्टिंग करत होती ती बातमी लोकांसमोर आणत होती त्या महिला पत्रिकाराला विचारलं अरे तू काय रिपोर्टिंग करते जस की तुझाच रेप झाला. तुझ्यावर बलात्कार झाला. हे लाडके भाऊ असू शकतात का तुमचे. नसू शकतात हे कदापि आपले लाडके भाऊ होणार नाही. जे आपले सुरक्षेसाठी उभे राहू शकत नाहीत. पुढे तुम्हाला जाऊन सांगतो भाजपचे जे किसन कातोरे नावाचे आमदार आहेत आणि मग घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधे स्वतः हे दोघेही टीव्हीवरून सांगतात की, हे आंदोलन जे झालं हे महिलेसाठी, त्या लहान मुलीसाठी आंदोलन नव्हत. जे अत्याचार होतात त्याच्या विरोधात आंदोलन नव्हत पण राजकीय आंदोलन होत. हा निर्लज्जपणा महाराष्ट्रात महाराष्ट्राचे सरकार मध्ये आला कधी. दोन वर्षांपूर्वीच हे खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलेल आहे. त्याला आता हटवल्याशिवाय आपण थांबायचं नाही, ही शपथ आपल्या लाडक्या बहिणीने घेतली आहे. ज्यादिवशी महिला तिथे रेल रोको करत होत्या ज्या दिवशी बदलापूर मध्ये आंदोलन होत होत त्याच दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते स्वतःच्या शेतावर, महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस साहेबांना विचारा की, फडणवीस साहेब तुम्ही एफआर का नाही घेतला. तुम्ही त्या शाळेला का वाचवत आहात आणि साहेब जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू होत तेव्हा तुम्ही दिल्लीत का बसला होता. खरे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, महिलांची माफी मागितली पाहिजे.

गेल्या दोन वर्षांमध्ये या देशात, आपल्या महाराष्ट्र मध्ये कोणाचंही भलं झालेलं नाहीये. कदाचित त्यांचे, अलीबाबा चाळीस चोरांचे भल झाल असेल. त्या 40 चोरांना 50 – 50 खोके मिळाले असतील. पण महाराष्ट्राला फक्त आणि फक्त धोके मिळालेले आहेत. भाजपाचे सर्वधर्मसमभाव म्हणजे सगळ्यांना लुटा हा आहे. महाराष्ट्राची आजची परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला बदला घेऊन चालणार नाही तर बदलायला लागेल. यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे. महाराष्ट्र हितासाठी सर्वांनी एक व्हा, निवडणूक येईल तेव्हा येईल तुम्ही एकजूट कायम ठेवा. मी तुम्हाला शब्द देत आहे की, येणार सरकार आपल असणार आहे, तुमचं सरकार असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असणार आहे, असा दावा ठाकरे यांनी यावेळी केला.

उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने शक्ती कायदा आणला होता 2020 मध्ये. आपण तो मांडला 2021 मध्ये तो पारित केला होता आणि तो शक्तीकायदा होता, जो कोणी बलात्कार करेल त्याला फासावर लटकावू हा. तो तत्कालीन जे भाजपचेच राज्यपाल होते त्यांना आम्ही भाज्यपाल बोलतो कोषारी साहेब त्यांनी तो पाठवला पण अजून तसाच आहे. राष्ट्रपती महोदयांकडे मी आज ही मागणी करतोय महिलांना सन्मान पाहिजे, महिलांना आधार पाहिजे तस महिलांना सुरक्षा देखील पाहिजे. तो शक्ती कायदा राष्ट्रपतींकडून पारित करून आणा तरच तुम्हाला इथे स्थान मिळेल नाहीतर तुम्हाला स्थान मिळणार नाही. शेतकरी त्रस्त आहे. आज महिला सुरक्षित नाहीयेत. आंदोलनासाठी दोघांनाही रस्त्यावर उतरायला लागते. शेतकरी आत्महत्या काही थांबत नाहीत. आज आपण सगळे विचार करतोय की निवडणुका लागणार तरी कधी लागणार. महत्वाची गोष्ट हीच आहे की दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. हरियाणाची निवडणूक जाहीर झालेली आहे. आपण पाहतोय जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे. पण माझा महाराष्ट्र असेल माझा झारखंड असेल इथे निवडणुका जाहीर झालेल्या नाही. कारण अजून भाजपने निवडणूक आयोगा आयोगाला परवानगी दिलेली नाहीये की निवडणुका इथे घ्या. त्यांच्या मनामध्ये भीती आहे. जर निवडणुका झाली तर लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर ही योजना बंद पडेल. कारण आज मी गडकरी साहेबांना विचारत आहे. मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल तुमच्याच खात्याकडे येत. तुमच्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिली गेलेली आहेत. गेले दहा वर्षे सुधारणात का नाही झाली ? खड्डे तशीच आहेत, खड्डे वाढत चाललेले आहेत. मग रस्त्यांची दुकाने बंद करा, टोल बंद करा, असे ठाकरे यांनी म्हटले. सभेस शेतकरी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुणाल दराडेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची सभा असल्याने शिवसेनेकडून इच्छुक असलेले युवा नेते जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी या सभेची जोरदार नियोजन करत पक्षप्रमुखांपुढे शक्तिप्रदर्शनच केल्याची चर्चा सुरू आहे. सभेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. सभेची वेळ सकाळी दहा वाजेची असताना सभा एक वाजता सुरू झाली तरीही सभेसाठी मोठी गर्दी झाल्याने या माध्यमातून त्यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शहरभर ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर व कटआउट लागले होते. नगर मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गावर प्रत्येक पोलला लावलेल्या स्वागताच्या कटआऊटने लक्ष वेधून घेतले होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे