येवला पूर्व विभागातील तहानलेल्या नागरिकांचे उपोषण सुरूच

येवला (विशेष प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पूर्व विभागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना पालखेड डाव्या कालव्याला चाळीस दिवस पाणी सुरू असतानाही पिण्यासाठी दोन दिवस पाणी न सोडल्याने पुर्वभाग परीसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. त्यातल्या त्यात निफाडकरांनी शेवटचे दोन दिवस सुरू असलेले पाणी फोडून घेतल्यामुळे तालुक्यातील पूर्व विभागातील तहानलेल्या नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यावर शांततेच्या मार्गाने या परिसरातील नागरिकांनी उपोषण सुरू केले असून सलग चार दिवसपासून उपोषण सुरूच आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जलसंपदा विभागाचे आमले, कार्यकारी अभियंता भागवत यांची संयुक्त बैठक होवूनही मार्ग निघालेला नाही. यावेळी धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याची आकडेवारी खेळता खेळता पाणी सोडण्याचे एकाही अधिकार्याला उत्तर सापडले नाही. वास्तविक 40 दिवस पालखेड डाव्या कालव्यातून पाणी वाहताना येवला तालुक्याचा पूर्व विभाग लक्ष ठेवून होता. किमान चार दिवस पाणी आपल्याकडे येऊन आपले बंधारे भरतील आणि दोन-तीन महिने पिण्याचे पाणी उपलब्ध होईल अशी भाबडी आशा होती परंतु अधिकाऱ्यांची उदासीनता लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष त्यात चाऱ्याची फोडाफोडी यातच पूर्व विभागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविण्यात आले आहे.
पाट अद्याप ओला असून त्वरित आठ दिवस पाणी सोडल्यास पाण्याची बचत होणार असून तहानलेल्या नागरिकांची तहान काही दिवस भागणार आहे. या भागात कितीही टॅंकरने पाणीपुरवठा केला तरी तो अपूर्ण ठरणार असून टँकर मुळे वेळोवेळी भांडणे उपस्थित होणार आहे. तसेच टँकरचा एक धंदाही या ठिकाणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.