पावसाळ्याच्या आत येवला शहरातील भुयारी गटारीचे काम पूर्ण करा : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
येवला शहरातील विविध विकास कामाचा आढावा

येवला, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानामधील येवला शहरात सुरू असलेले मलनिस्सारण प्रकल्पाचे /भुयारी गटारीचे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे. येवला शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात यावी. व्यापारी संकुल सुरू करण्यात यावे तसेच मनमाड येवला शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण व येवला चौफुली येथे उड्डाणपूल निर्मितीबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येवला शहरातील विकास कामाची आढावा बैठक येवला संपर्क कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, येवला शहरातील पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेत पालखेड कॅनालमधून येवला नगरपालिका साठवण तलावात इनलेट गेट टाकणे, छोट्या तलावातून मोठ्या तलावात पाण्याचा प्रवाह जलदगतीने होण्यासाठी अॅडीशनल पाईप टाकणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानामधून येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजना, स्वातंत्र सेनानी तात्या टोपे स्मारकाच्या कामाचा आढावा घेत येवला शहरातील बांधकाम पूर्ण झालेले व्यापारी संकुले सुरू करताना जुन्या गाळे धारकांना प्राधान्य देऊन संकुल करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच येवला शहरातील स्वच्छता व नागरी घनकचरा प्रकल्प, येवला शहर बाह्यवळण रस्त्याचा आराखडा तयार करणे, शहरातील रस्ते, शहरात सीसीटीव्ही बसविणे, नवीन भाजीपाला मार्केट सुरु करण्यात यावे, भाजीपाला मार्केटसाठी नवीन जागा, फेरीवाले लहान व्यापारी यांना अर्थसहाय्य, महिला बचत गटांना अर्थसहाय्य करण्यासाठी कॅम्प राबविणे यावी, येवला पोस्ट ऑफिससाठी जागेचा प्रस्ताव सादर करणे, प्रधानमंत्री शहरी आवास योजना, गंगादरवाजा येथील झोपडपट्टीधारकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प, नगरपरिषद कर्मचारी निवासी इमारत, केशवराव पटेल मार्केट च्या जागेवर वाणिज्य संकुल व बहुमजली वाहनतळ निर्माण करण्यात यावी, विंचूर चौफुलीवरील सिस क्र.३८१२ (१०० अ) या जागेवर वाणिज्य संकुल निर्माण करणे यासह सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दिपक लोणारी, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, प्रभारी तहसीलदार पंकज मगर, नगर अभियंता आर.व्ही. सुतावने, प्रशासकीय अधिकारी रोहित पगार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत भोये, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, डी.बी.आवारे, आर्किटेक्ट चेतन सोनार, रोहित सोनार, अभिषेक आहेर, एस.एस.गाडे, यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.