औद्योगिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी मटेरियलमध्ये संशोधन व्हावे : डॉ. रत्नेश कुमार
एसएनडी अभियांत्रिकीत क्लिन इंजिनिअरिंग मटेरियल्सवर कार्यशाळा

येवला (प्रतिनिधी) : विद्यार्थी व प्राध्यापकांनी संयुक्तपणे विविध इंजिनियरिंगमध्ये कच्चे मटेरियलमध्ये (सामग्री) संशोधन करायला हवे. त्यामुळेच औद्योगिक विकासाचा वेग वाढेल. सोबतच पर्यावरणाचा ऱ्हास होवू याची काळजी घेण्याची गरज आहे. शाश्वत तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यासाठी अभियांत्रिकी सामग्रीच्या महत्त्वपूर्ण भूमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे जेष्ठ प्राध्यापक डॉ. रत्नेश कुमार यांनी केले.
बाभुळगाव येथील एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्रामध्ये क्लिन इंजिनिअरिंग मटेरियल्स या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना डॉ. रत्नेश कुमार बोलत होते. या संस्थेचे प्राध्यापक डॉ. सचिन बाकरे प्रमुख पाहुणे होते. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली आणि एआयसीटी ई-ट्रैनिंग अँड लर्निंग अकॅडेमी पुरस्कृत हि कार्यशाळा १८ ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेसाठी ३ लाख ५० हजार निधी महाविद्यालयाला प्रथमच मिळाला. कार्यशाळेसाठी ५८ हून अधिक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विभागप्रमुख डॉ. यू. एस.अन्सारी व डॉ. हरजीत पवार यांनी कार्यक्रमाचे डायनॅमिक समन्वयक म्हणून काम केले.
ज्ञानाच्या प्रगतीमध्ये आणि नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये संशोधन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे आपल्याला आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्यास आणि समस्यांवर उपाय शोधण्यात मदत करते. विद्यार्थी व प्राध्यापकांनी संयुक्तपणे मटेरियल सायन्समध्ये संशोधन करायला हवे. त्यामुळे विकासाचा वेग वाढेल असे मार्गदर्शन करतांना डॉ. सचिन बाकरे, विकास पाटील (पुणे), डॉ. सुदर्शन बोबडे, डॉ. मुजाहिद हुसेन, डॉ. प्रदीप सोळंकी, डॉ. निलेश माटे, डॉ. मधुकर वाकचौरे, सचिन पाटील, कल्पेश पाटील यांनी केले. सहा दिवसात विविध विषयावर मार्गदर्शनपर सत्र पार पडले. यावेळी प्रा. सचिन सावंत, प्रा.रामदास शिंदे, प्रा. संदीप कराळे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ड्रिप इरीगेशन पाइप, नासिक येथे एक दिवसीय औद्योगिक भेट देऊन विविध पाइप मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग व टेस्टिंग यांचा अभ्यास करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. रोहित पोटे यांनी केले. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. हरजीत पवार यांनी आभार मानले. जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रुपेश दराडे, प्राचार्य डॉ. डी. एम. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली.