Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्री पदच काय आमदारकीची सुध्दा फिकीर नाही : मंत्री छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते स्वतंत्र द्या, ओबीसीतून नको : छगन भुजबळ

0 0 9 8 4 4

पंढरपूर (प्रतिनिधी) : सरसकट ओबीसी मध्ये संपूर्ण मराठा समावेश हे कदापिही शक्य नाही. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही तर वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या मागासवर्गीयांना सामजिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे. आम्ही अन्याय सहन करणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते स्वतंत्र द्या, ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

टिळक स्मारक मैदान पंढरपूर येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा आज पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. महादेवराव जानकर, आ. गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, प्रा. टी. पी. मुंडे, कल्याण दळे, दौलतराव शितोळे, बाबासाहेब देशमुख, डॉ. स्नेहा सोनकाटे, चंद्रकांत बावकर, जे. डी. तांडेल, बापू भुजबळ, शंकरराव लिंगे, ईश्वर बाळबुधे, रमेश बारस्कर, हरिभाऊ गावंदरे, माऊली हळणवर, अनिल अभंगराव यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील वंचित घटकांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांची लढाई ब्राम्हणांच्या विरुद्ध नव्हती तर ब्राम्हण्यवादाच्या विरुद्ध होती. आता परिस्थिती वेगळी असून अन्याय करणारे बदललेले आहे. आपल्यावर जे लोक अन्याय करतील त्यांच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी राज्यातील सर्व ओबीसी, दलीत आदिवासी यांना एकत्र घेऊन प्रत्येक गावात रॅली काढा, मोर्चे काढा, चुकीचे दाखले दिले जाताय त्याच्यावर आवाज उठवावा लागेल असे आवाहन त्यांनी केले.

महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज राज्याभिषेक दिन.ज्यांनी स्वतः ची फौज तयार केली. इंग्रजांविरुद्ध लढा दिला. सर्व लढाया जिंकल्या. इंग्रजांच्या मनात इतकी दहशत होती की, प्रत्येक वेळी इंग्रजाना तह करावा लागला. इंग्रजांना देशातून बाहेर काढून टाकण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचले. त्यांची नेपोलियनशी तुलना केली जायची. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते जर अजून २० ते २५ वर्ष जगले असते तर आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळाले असते असे प्रतिपादन भुजबळ यांनी केले. ओबीसी समाजातील बांधव अतिशय गरीब आहे. या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हा बहुजन समाज येत असतो. हा पांडुरंग सर्व समाजाचा आहे तो कुठल्या समाजाचा नाही हे लक्षात घ्यावं. जे म्हणतात आमची लेकर बाळ अतिशय गरीब आहे, ज्यांच्याकडे फुले उधळण्यासाठी दोनशे जेसीबी आहे, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाते ते गरीब आहे असे म्हणतात. बीड जिल्ह्यात दोन बांधव मृत्यु पावले. येवल्यातील जेसीबीतून फुले उधळताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुध्दा ते आले नाही. त्यांचा विचार करणार की नाही अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली. तसेच केवळ मुंबईत आंदोलन कुठे करायचे म्हणून दोनशे गाड्याचा ताफा घेऊन मुंबईत गेले ते गरीब आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

परीट समाजाच्या कृष्णा सोनटक्के यांनी उधारी मागितली म्हणून त्याला लोखंडी सळई ने मारण्यात आल. आज तो जीवन मरणाची लढाई लढत आहे. मात्र अद्याप गुन्हेगार सापडत नाही. जर पोलिसांना गुन्हेगार सापडत नसेल तर आमचा ओबीसी बांधव तुम्हाला सापडून देईल असा इशारा त्यांना दिला. राज्यात अशा अनेक घटना होत आहे. सोलापूर जिल्ह्यात अपंग मुलाला फाशी देऊन त्याचा खून झाला. नाभिक समाजातील कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांचं घर, गोठे जाळण्यात आले. ओबीसी समाजावर असे अन्याय होत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा ओबीसींचा उद्रेक होईल असा इशारा भुजबळ यांनी दिला. तसेच हा लढा लढण्यासाठी ओबीसी समाजातील सर्व घटकांसोबत, दलीत आदिवासी यांना सोबत घेऊन आपल्याला लढा द्यायचा आहे. यातील कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल तर आपल्याला आवाज उठवावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीएससी, युपीएससी, मंत्रालय यासह अनेक ठिकाणी मराठा समाजाला ३५ टक्क्यांहून अधिक संधी आहे. आणि ओबीसी समाजाच्या केवळ ९ टक्के जागा भरलेल्या आहेत. मराठा आरक्षणाचे जे काय करायचे ते करा पण पहिल्यांदा ओबीसींचा अनुशेष भरून काढावा. आपण मंत्री म्हणून देखील शासनात आवाज उठवत आहे. आपल्याला आमदारकी, मंत्री पदाची फिकीर नाही. केवळ ओबीसी, दलीत आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला लढा आहे. त्यामुळे या राज्यात या गोरगरिबांची काळजी घेणार आणि सर्व समाजाला संधी देणार सरकार आपल्याला आणायचे असल्याचे आवाहन भुजबळ यांनी उपस्थितांना केले. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षण १५ दिवसांत होणार, जर २ दिवसांत आणि १५ दिवसांमध्ये सर्वेक्षण होणार असेल तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातींची जनगणना करुन टाका. आमचे हेच म्हणणे आहे. सर्व पक्षांची आणि नेत्यांची एकच मागणी आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. त्यातून होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी असे मंत्री भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ हे समाजात तेढ निर्माण करताय अस म्हटल जातय. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणातून वाटा मागणे चूक आहे, जाळपोळ करणे चूक आहे, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यांसोबत संबंध ठेवणे चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणे चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गावबंदी करणे चूक आहे, एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद जाहीर करून इतर सर्व लोकांना वेठीस धरणे चूक आहे, अमुक अमुक तरखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी धरून शासनाला धमकी देणे चूक आहे, सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियाला फाटा मारून ओबीसींच्या ताटातले आरक्षण मागणे बेकायदेशीर आणि चूक आहे. आम्ही घडवणारे आहोत पेटवणारे नाही अशी टीका करत, जे चप्पल फेकण्याची भाषा करताय त्यांनी लक्षात घ्यावं की, तुमच्या पायात चप्पल असेल तर आमच्या पायात बूट आहे असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे