कृषीवार्ताब्रेकिंगस्थानिक
येवल्यात लिलाव सुरू करण्याच्या कारणावरून हाणामारी
शेतकरी जखमी तर माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणीकृत व्यापारी व हमाल मापाऱ्यांच्या वादामुळे लिलाव बंद आहे. संचालक मंडळाच्या वतीने आयोजित बैठकीत यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यानंतर येवला – मनमाड मार्गावरील खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला. तर लिलाव सुरू करण्याच्या कारणावरून हमाल मापारी गट प्रक्षुब्ध झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत नाटेगाव येथील एक शेतकरी डोक्यात दगड लागल्याने जखमी झाला. तर जमावाने चित्रीकरण करत असलेल्या माध्यम प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे, दीपक सोनवणे यांना धक्काबुक्की केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नोंदणी कृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी न करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र बाजार समिती बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला. यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले. तसेच या ठिकाणी झालेल्या दगडफेकीमध्ये एक शेतकरी जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक दाखल झाले. शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.
सकाळी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने येवला तहसीलदार आबा महाजन, जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, शिवसेना नेते संभाजीराजे पवार, संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, बाजार समितीचे सभापती किसन धनगे, उपसभापती बापूसाहेब गायकवाड, संचालक संजय बनकर, वसंतराव पवार, भास्करराव कोंढरे, सचिन आहेर, महेश काळे, रतन बोरणारे, नंदकिशोर अट्टल, भरत समदाडीया, सचिव कैलास व्यापारे व व्यापारी प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत लिलाव सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली मात्र व्यापारी संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लिलाव सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका व्यापारी संघटनेने घेतल्याने काहीही तोडगा निघू शकला नाही. आता व्यापारी संघटना काय निर्णय घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.
0
0
9
8
4
4