ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा संप कायम

येवला (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा बेमुदत संप कायम रहाणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू शेलार यांनी केले आहे.
संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हंटले आहे की, संगणक परिचालकांच्या न्याय मागण्यांसाठी १० नोव्हेंबर पासून संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद पुकारले आहे. मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुनिता आमटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपोषण केले होते. दरम्यान, मागण्यांवर विचार करण्यात येईल असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले होते. आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्याने संप सुरुच राहणार असल्याचे सदर निवेदनात म्हंटले आहे.
१५ जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद सातारा येथे संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. काही तथाकथित संघटनांनी संप स्थगीत केल्याचे जाहीर केले असले तरी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा याच्याशी काहीही संबंध नाही संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे निवेदनाच्या शेवटी म्हंटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्तू शेलार, रूपेश कुंभारकर, सुरेश ठोंबरे, अल्ताफ सय्यद, महेश मोरे, सचिन बढे, श्रीकांत मुंढे, सोमनाथ जेजुरकर, सुनील पैठणकर, गणेश कुदळ, जालिंदर भड, किशोर शिंदे, केतन रोडे, मच्छिंद्र देवरे, संध्या गरुड, मनीषा गरुड, विनोद तनपुरे यांच्यासह पदाधिकारी व संगणक परिचालक उपस्थित होते