क्रिडा व मनोरंजनस्थानिक
ज्यांच्या जीवनात खेळ नाही त्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा होतो : शैलेंद्र गायकवाड
येवला महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन साजरा

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : ज्यांच्या जीवनात खेळ नाही त्यांच्या जीवनाचा खेळखंडोबा होतो, असे सांगून जीवनात खिलाडू वृत्ती महत्त्वाची असते. खेळाने शरीर व मन निरोगी राहते. विजिगिषू वृत्ती वाढते. एकाग्रता व निर्णयक्षमता वाढते. खेळाडूंमध्ये नम्रता व सुसंस्कार हे गुण दिसून येतात. सतत कार्यमग्नता असल्याने वाईट गोष्टी, व्यसन आदिंपासून खेळ व्यक्तीला दूर ठेवतो. खेळामुळे जीवन आनंदी होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळात सहभागी झालेच पाहिजे असे प्रतिपादन क्रीडाशिक्षक शैलेंद्र गायकवाड यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन तथा आॅलिम्पिक वीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून क्रीडाशिक्षक गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भाऊसाहेब गमे हे होते.
यावेळी गायकवाड यांनी ‘जीवनातील खेळाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान देताना स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक आॅलिम्पिक पदक विजेते खेळाडू खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी आॅलिम्पिक मध्ये कुस्ती या क्रीडाप्रकारात वैयक्तिक कांस्य पदक पटकाविल्याचा विक्रम ४४ वर्षे टिकला यावरून खाशाबा जाधव यांच्या विजयाचे महत्त्व आपल्या लक्षात येते असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डाॅ. गमे यांनी, महाविद्यालयाचा क्रीडा विभाग अत्यंत कार्यक्षम असल्याचे सांगून येवला महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विद्यापीठ तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळत असतात अशी माहिती दिली. राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळणा-या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी राखीव जागांवर नोकरीची संधीही मिळते त्यातून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध शासकीय सेवेतील पदांवर भरती झालेले आहेत असेही ते म्हणाले. खेळामुळे विशेषतः योगामुळे, व्यायामामुळे शरीर सुदृढ बनते, मन एकाग्र होते व त्यामुळे केलेला अभ्यास स्मरणात राहतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास व व्यायाम करावा असे सांगून महाविद्यालयीन जीवनात आपणही खेळात सहभागी होत होतो, नियमित अभ्यास करत होतो त्यामुळेच जीवनात यशस्वी होऊ शकलो असेही ते म्हणाले.
यावेळी महाविद्यालयाचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू रोहीत सोनवणे, दर्शन गायकवाड, दर्शन ताटे, रोहन लोणारी यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा. प्रदीप वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. धनराज धनगर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कैलास चौधरी यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
9
8
4
4