मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बाळापुर ते दरसवाडी दरम्यान दरसवाडी डोंगरगाव कालव्याची पाहणी

येवला (प्रतिनिधी) : राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला तालुक्यातील बाळापुर ते दरसवाडी धरणापर्यंत दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता संगीता जगताप, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, अरुण शिरसाठ, लक्ष्मण कदम, अल्केश कासलीवाल, मकरंद सोनवणे, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी आज बाळापुर कालव्याच्या पाहणीस सुरुवात केली. त्यांनी बाळापूर येथे उभारण्यात आलेल्या काँक्रीट प्लांटसह, पुलांच्या कामाची पाहणी केली तसेच विखरणी, कातरणी, सांगवी, समीट तळेगाव मार्गे दरसवाडी धरणापर्यंत दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या दुरुस्तीची व अस्तरीकरण कामाची पाहणी केली.
यावेळी दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण व दुरुस्तीचे काम येणाऱ्या पावसाच्या पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दरम्यान स्थानिक शेतकरी बांधवांनी मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कार केला.