ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पुढ यायला हवं : छगन भुजबळ
इंदापूर येथील ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात ओबीसी बांधवांचा जनसागर

इंदापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्ही एवढंच मागतोय. परंतु कुणी दादागिरीची भाषा करत असेल तर आम्ही देखील दादागिरीने उत्तर देऊ असे सांगत मंडलच्यावेळी देखील सर्व एकत्र येऊन लढले होते. आताही ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी पुढं यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केल.
इंदापूर येथे राज्यभरातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ.महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.लक्ष्मण गायकवाड, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी, प्रा.टी.पी.मुंडे, आगरी नेते प्रा. राजाराम पाटील, माजी खासदार समीर भुजबळ,रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे, इतर मगासवर्ग अयोजाचे माजी सदस्य प्रा .लक्ष्मण हाके, नाभिक समाजाचे नेते कल्याण दळे, आयोजक अॅड. कृष्णाजी यादव, पांडुरंग शिंदे, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व इंदापूर येथील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम करतोय असे लोक म्हणतात. त्यांना सांगायचं आहे की, त्यांच्या पंधरा सभा झाल्यानंतर आम्ही ‘सौ सोनार की एक लोहार की’ म्हणून एक सभा घेऊन आमची भुमिका मांडत आहोत. अशावेळी मात्र त्यांना कायद्यात सुट दिली जातेय. त्यांना कायदा वेगळा लावला जातोय त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. त्यांना कायद्याची सुट आणि आम्हाला मात्र कायदा लावला जातोय अस दिसतंय. त्यामुळे राज्यात अशांतता कोण निर्माण करतंय याचा सर्वांनी अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राहता तालुक्यात मतदानाचा राग मनात ठेऊन दलित कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागे असाच प्रकार तुळशी गावात नाभिक समाजाच्या बाबतीत झाला राज्यात नेमकं चाललंय काय ? या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची ? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात अनेक पोलीस आंदोलनात जखमी झाले मग या राज्यात अशांतता निर्माण कोण करतोय ? असा सवाल उपस्थित करत दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं जाईल असा इशारा देत पोलिसांवरील हल्ले थांबवा त्यांच्या भडकावू भाषणांना थांबवा अन्यथा जशाच तसं उत्तर आम्हीही देऊ शकतो असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं. तेथील शेतकऱ्यांनी मला फोन केला की तुम्ही बघायला या. त्यावेळी मी पाहणीस गेलो. तीन लाखांच्या मतदारसंघात तीस लोक गो बॅक चे बोर्ड घेऊन पुढे आले. अगदी सगळ्या ठिकाणी तेच होते. त्यानंतर मी ज्या रस्त्यांनी गेलो ते रस्ते आम्ही शुद्र आहोत म्हणून गोमुत्र टाकून साफ केलं. मग आम्ही जर शुद्र असू तर प्रमाणपत्र घेऊन शुद्र का होताय ? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच बिहार सारखे राज्य जातनिहाय जनगणना करू शकते मग महाराष्ट्र का करू शकत नाही. महाराष्ट्रात देखील जात निहाय जनगणना करायला हवी. शिंदे आयोगाचे अध्यक्ष न्यामूर्ती शिंदे जी भूमिका घेत आहे त्याला आपला विरोध असून गेल्या दोन महिन्यात देण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावे. ओबीसींचा नोकऱ्यामधील अनुशेष भरून काढावा. मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्याव. ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नये, अशा मागण्या भुजबळ यांनी यावेळी केल्या.