
येवला (प्रतिनिधी) : पालखेड कालव्याला आवर्तन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कालवा पसिसरतील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. हा वीज पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती संजय बनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येवला तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. याची शासनाच्या प्रतिनिधींनी स्वतः बांधावर येऊन पहाणी देखील केलेली आहे. या नुकसानीतुन शेतकरी सावरत नाही, तोच येवला तालुक्यात पाणी टंचाई भासत आहे. ज्या शेतक-यांना शेतीसाठी थोड्या प्रमाणात पाणी आहे, त्यांचा देखील विजपुरवठा खंडीत झाल्याने आहे ते पाणी पिकांना देणं शक्य होत नाही.
नुकताच आपल्या स्तरावरून एक निर्णय घेतलेला आहे. पालखेड धरणातुन पालखेड डाव्या कालव्यावरील गावांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याकरीता दि.१२ डिसेंबर ते दि.२० जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत विज पुरवठा करण्यात यावा. आणि इतर पुर्ण वेळ बंद असावा. परंतु महावितरण जे ३ तास विजपुरवठा देत आहे, तो देखील महावितरणाच्या अनागोंदी कारभारामुळे सुरळीत मिळत नाही. आपण घेतलेल्या या निर्णयामुळे ज्या शेतक-यांकडे आज त्यांच्या सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांना शेतात पिकांना पाणी देता येणार नाही. परिणामी पाणी उपलब्ध असताना देखील पिकांना पाणी न मिळाल्याने पिकं करपण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.