शाळांत अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासह आनंददायी शिक्षणासाठी स्नेहसंमेलन उपयुक्त : शकुंतला कानडे
एरंडगाव विद्यालयात रंगला विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

येवला (प्रतिनिधी) : अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन गरजेचे असते. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही मिळतो, असे प्रतिपादन पू. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला कानडे यांनी काढले.
तालुक्यातील एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात कानडे बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्टपणे सादरीकरण करून वाहवा मिळविली. सुमधुर गीतांच्या तालावर ठेका धरत पाचवी ते बारावीच्या मुलांनी केलेला कलाविष्कार पालकांनाही भावला. संचालक दिगंबर बाकळे, माजी प्राचार्य गुमानसिंग परदेशी, सुनील मेहेत्रे, साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरगच्च कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन पार पडले.
स्नेहसंमेलनानिमित्त सजवलेले व्यासपीठ व संपूर्ण विद्यालयाच्या प्रांगणात देण्यात आलेला आकर्षक मंडप यामुळे वेगळाच माहोल होता. विद्यार्थी नृत्याविष्कार व कलागुण सादर करत असताना विद्यार्थ्यांच्या कलेला दाद देत पालकांनी आवडलेल्या कलेला भरभरून बक्षिसांची बरसात केली. यावेळी प्राचार्य लक्ष्मण बारहाते व शिक्षक शिक्षकेतरांच्या हस्ते कानडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक करून कानडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही दाद दिली.
दरम्यान, विद्यालयाचे स्नेहसंमेलन अतिशय उत्स्फूर्तपणे व आनंददायी वातावरणात पार पडले. प्रारंभी कानडे व प्राचार्य बारहाते यांच्या हस्ते नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नृत्याविष्कार व कलागुणांचा सुरू झालेला सोहळा सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत सुरू होता. उचकी लावणीवर क्षितिजा रंधे हिने केलेले नृत्य अप्रतिम ठरले. तर कृष्णा रंधे यांने इंदुरीकर महाराजांची केलेली मिमिक्रीने सर्वत्र हशा पिकविला. हाय झुमका वाली पोर. दैवत छत्रपती, गोंधळ या नृत्याविष्कारांना वन्स मोर मिळाला. हरहर शंभो, देश रंगीला, लॉंग लांची, मला जाऊ दे, गजरा फुलला, नहीं मिलेगा ऐसा घागरा, यासह असंख्य गाण्यावर विद्यार्थ्यांनी एकशे बढकर एक अदाकारी सादर करून या संमेलनात रंगत आणली. माधुरी सूर्यवंशी, वंदना वरंदळ शिल्पा सूर्यवंशी, राहुल आढांगळे, यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक भाऊसाहेब वाघ, जेष्ठ शिक्षक राधिका बावके, दिनेश धात्रक, संजय वाबळे, विलास गोसावी, कैलास लोणारे, विठ्ठल पैठणकर, सविता बोरसे, कमलेश पाटील, जयश्री पडवळ, संजय मढवई, श्रद्धा जोंधळे, अनिल गावकर, विपीन ज्ञाने, किरण खकाळे, गणेश शिंदे आदींनी नियोजन केले.