Breaking
देश-विदेशमहाराष्ट्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ

‘वंदे भारत’च्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा रेल्वेचा मानस : रावसाहेब दानवे

0 0 9 8 4 7

जालना (जिमाका) : जालना-मुंबई वंदे भारत ही अत्याधुनिक रेल्वे आजपासून सुरु झाली आहे. जालनेकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी काढले. जालना-छत्रपती संभाजीनगर-नाशिक-ठाणे ते मुंबई असा जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचा प्रवास असून या रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

अयोध्या रेल्वे स्थानकावरुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात श्री. फडणवीस व श्री. दानवे यांनी सदर प्रतिपादन केले. मंचावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार संतोष दानवे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनीयुक्त रेल्वेप्रमाणे आहे. महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे. याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त करतो. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. सध्या 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी ही ट्रेन दोन वर्षात 250 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरु आहेत. यावर्षी 13 हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ते जालना दरम्यानचे इलेक्ट्रीकचे काम पूर्ण झाले असल्याने जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी वंदे भारत रेल्वे सुरु करता आल्याने समाधान वाटत आहे. जालना-छत्रपती संभाजीनगर- नाशिक-ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा मानस आहे. या रेल्वेची 530 प्रवासी क्षमता असून एकूण 8 डबे जोडले आहेत. भारतामध्ये वंदे भारत रेल्वेंची संख्या 34 झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास 1 हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरु होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. त्यालाही पैसे उपलब्ध करुन दिले आहेत.

जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभानंतर याच रेल्वेतून देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे व इतर मान्यवरांनी प्रयाण केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे