Breaking
महाराष्ट्र

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा

0 0 9 8 4 5

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

गोरेगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलिस दलाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, हरियाणा येथे आयोजित आखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर -२०२३ स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने सहा सुवर्ण चार रौप्य व बारा कांस्य अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत. जागतिक पोलीस आणि फायर गेम्स २०२३ विनिपेग कॅनडा येथे आयोजित कुस्ती /बॉडी बिल्डिंग/ फिझिक्स बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी तीन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण सात पदके प्राप्त केली आहेत. मुंबई येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय आणि साऊथ एशियन रब्बी स्पर्धेत- २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस रब्बी संघाने कांस्यपदक प्राप्त केले आहे.

भोपाळ येथे आयोजित ६३ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी एक सुवर्ण चार रौप्य व सहा कांस्य अशी एकूण ११ पदके प्राप्त केले आहेत. गुजरात येथे आयोजित २४ व्या अखिल भारतीय पोलीस बॅण्ड स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस पाईप बँड संघाने सुवर्णपदक प्राप्त केली आहेत तसेच बिगुल संघाने सुवर्ण पदक, ब्रॉस बॅण्ड संघाने कांस्य पदक प्राप्त केले आहे. तसेच बेस्ट पाईप ब्रँड प्रकारात एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस पाईप ब्रँड संघाने सलग सहा सुवर्ण पदक प्राप्त केली आहेत. अशा प्रकारे राज्याची संघभावना कायम राखून राज्याचा नावलौकिक केले आहे. असेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.

श्री. फणसाळकर म्हणाले की, २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो. सागरी सुरक्षा, नक्षलवादाबरोबरच सायबर सुरक्षा सारखे नवे आव्हान उभे आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात सध्या एकूण ४८ सायबर पोलीस ठाणे व ४४ सायबर लॅब सुरू करण्यात आल्या असून अत्याधुनिक तंत्रसामुग्री पुरविण्यात येत आहेत. तसेच यावर्षी पोलीस दलामध्ये १८ हजार नवीन पदे भरण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. बॅण्ड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाला मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी तसेच पोलीस जवान उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे