आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडायची नाही, हाच नवीन वर्षाचा संकल्प : मनोज जरांगे

अंतरवली सराटी (जि. जालना) : राज्यातील गोरगरीब गरजवंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडायची नाही, हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
जरांगे यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतल्या शिवाजी पार्क, बीकेसी आणि आझाद मैदान या तिन्ही मैदानाची पाहणी केली. मुंबईत जाणाऱ्या मराठ्यांची संख्या मोठी असल्याने ही तिन्ही मैदाने मराठा आरक्षण आंदोलनासाठी लागतील. मात्र, आमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोनपैकी एका मैदानात होईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला राग नाही. यामागे माझा कोणताही द्वेष भाव किंवा राग नाही. पहिल्यांदा ते विरोधात बोलले होते, म्हणून मी बोललो होतो. आमचा लढा आरक्षणासाठी आहे. मराठयांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका ही घेणार नाहीत. देवेंद्र फडणीस हे मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत, असेही जरांगे यावेळी म्हणाले. दरम्यान, जरांगे हे येत्या ४ जानेवारी ते ८ जानेवारीपर्यंत जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदा पट्ट्यातील १२३ गावांचा दौरा करणार आहेत.