Breaking
स्थानिक

येवला मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरच आपलं काम : मंत्री छगन भुजबळ

भुजबळ यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन

0 0 9 8 4 5

येवला (प्रतिनिधी) : येवला मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आपलं काम सुरू असून येणाऱ्या पावसाळयात महत्वकांक्षी मांजरपाड्याचे पाणी यंदाच्या पावसाळयात डोंगरगाव पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते येवला मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे २० कोटी रुपयांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रा.ज्ञानेश्र्वर दराडे, मकरंद सोनवणे, डॉ.प्रवीण बुल्हे, ॲड.राहुल भालेराव, सरपंच संदीप पुंड, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, योगेश खैरनार, साईनाथ शिंदे, प्रदीप कानडे, प्रा.भालेराव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येवला मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी सुमारे १५१ किलोमिटर पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन जून मध्ये मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ते काम नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

केवळ विकासाच्या मुद्यावर आपण निवडणूक लढलो आहे. विकासाच्या कामात आपण कुढे कमी पडत असेल तर आपण सांगितले पाहिजे. मात्र इतरच विषयांवर चर्चा घडवून आणली जात आहे. विकासाची अनेक कामे आपण आजवर केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वच मागण्या सोडविण्यासाठी आपले प्रयत्न असून मतदारसंघातील सर्वच प्रश्न मार्गी लावले जातील असे भुजबळ यांनी सांगितले. येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रमुख सरदार आणि मावळ्यांचे म्युरलस लावण्यात येणार आहे. या भव्य दिव्य शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल असेही त्यांनी सांगितले.

या रस्त्यांचे झाले भूमिपूजन

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सायगांव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत येवला-वडगांव बल्हे-बल्हेगांव-गोल्हेवाडी-सायगांव-न्याहारखेडा- रहाडी या ५ कोटी ८१ लाखांच्या रस्त्याचे, पिंपळखुटे तिसरे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गतगोल्हेवाडी-नगरसुल-पिंपळखुटे तिसरे-तालुका हद्द या ५ कोटी ४७ लक्ष किमतीच्या रस्त्याचे तर शिरसगांव लौकी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत देशमाने-शिरसगांव लौकी- लौकी शिरसगांव- आडगांव रेपाळ या ९ कोटी ११ लाख किमतीच्या रस्त्याचे भुमीपूजन करण्यात आले.

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा आढावा

सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील धुळगावसह १७ गावे पाणी व राजापूरसह ४१ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या कामांचा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेऊन योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिक्षक अभियंता सुबोध मोरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे