Breaking
क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशमहाराष्ट्र

नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप; यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

0 0 9 8 4 7

नाशिक (प्रतिनिधी) : जगातील सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केले. दरम्यान, या युवा महोत्सवात यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले, तर हरियाणा आणि केरळने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

नाशिक येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या २७ व्या क्रीडा महोत्सवाचा आज सकाळी महायुवाग्राम, हनुमाननगर येथे समारोप झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक वनिता सूद, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. प्रारंभी युवा गीत आणि महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नियोजन केले. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वेळोवेळी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे युवकांच्या या कुंभमेळ्याचे यशस्वीपणे संयोजन करता आले. या महोत्सवाच्या पाच दिवसांत नाशिककरांनी युवकांना भरभरून प्रोत्साहन दिले. त्यामुळे यजमान महाराष्ट्रासह नाशिककरांच्या आदरातिथ्याचा नावलौकिक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, नाशिक जिल्हा प्रशासनाने अत्यंत परिश्रम घेत अवघ्या 20 दिवसांत या महोत्सवाची तयारी पूर्ण केली. त्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यांनीही या महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले. यानिमित्त राज्य शासनाने ‘महा एक्स्पो’चे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून देशातील युवक – युवतींमध्ये विचार, संस्कृतीचे आदान- प्रदान होऊन देशाची अखंडता आणि राष्ट्रवादाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक श्रीमती सूद म्हणाल्या, राष्ट्रीय युवा महोत्सव हा विविध रंगांनी भरलेला होता. या महोत्सवात सहभागी युवक – युवतींनी महोत्सवाचा आनंद, अनुभव घेतला. त्यामुळे नवी उमेद आणि उत्साह घेऊन सहभागी युवक- युवती घरी जातील.

श्री. दिवसे म्हणाले की, गेल्या पाच दिवसांपासून हा महोत्सव सुरू होता. या महोत्सवात देशातील 31 राज्यातील साडे सातहजारांवर युवक – युवती सहभागी झाले होते. याशिवाय रोज किमान ५० हजार नागरिक महोत्सवास भेट देत होते. पाच दिवसांत तीन लाख नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. बाहेरून आलेल्या युवकांची 120 हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कमी कालावधीत यशस्वीपणे संयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवा महोत्सवात झालेल्या विविध कला, क्रीडा व वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागाचे सह संचालक सुधीर मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

सहकार्याबद्दल सत्कार

नाशिक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या यशस्वी संयोजनात सहकार्य केल्याबद्दल श्री. क्षेमकल्याणी यांच्यासह उद्धव निमसे, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ॲड. नितीन ठाकरे, सुरेश केला यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह पोलीस, मनपा, जि.प, क्रीडा विभागाचे राज्यभरातील अधिकारी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे