विश्वलता महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय श्रम संस्कार हिवाळी शिबिराचे उद्घाटन संपन्न

येवला (प्रतिनिधी) : श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सावरगाव येथे सात दिवसीय एनएसएस शिबिराचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
सदर सात दिवसीय श्रम संस्कार हिवाळी शिबिराचे उद्घाटन महंत श्री. बापू कुलकर्णी, शिवसेना नेते श्री. संभाजीराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्था संचालक श्री. भूषण लाघवे यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन होऊन झाले.
१०० विद्यार्थ्यांच्या या शिबिराची लोकसंख्या नियंत्रण तसेच गाव- शहर स्वच्छता या घोषवाक्यांसह सुरवात झाली. श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत हे शिबिर होत असल्याने यास विद्यार्थांना श्रमासोबत विशेष संस्कार देखील प्राप्त होतील असे मत महंत श्री. बापू कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शिवसेना नेते श्री. संभाजीराजे पवार यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत ग्राम विकास या विषयाबद्दल तरुणांमध्ये देखील तळमळ असायला हवी असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिबिरात होऊ घातलेल्या उपक्रम अत्यंत यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत आदर्श तरुणाच्या जडणघडणीत शिबिराचे निश्चित योगदान असेल अशी भावना श्री. भूषण लाघवे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी सरपंच सौ. संगीताताई पवार, प्रा. ज्ञानदेव कदम, जळगाव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वनिताताई वाघ, उच्चतंत्र शिक्षण संचालक श्री.अरविंद मोरे यांनीही विद्यार्थ्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. गोरक्षनाथ पवार यांनी केले. समारंभ यशस्वितेसाठी प्रा. अमोल मोरे, प्रा. प्राजक्ता तासकर, प्रा. प्रीती गुजर, प्रा. गीता बोराडे, प्रा. मयुरी पाटिल यांनी परिश्रम केले. सूत्रसंचालन एनएसएस विद्यार्थिनी कु. सोनल चव्हाण हिने केले.