Breaking
महाराष्ट्र

यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी समितीच्या माध्यमातून शासन सकारात्मक निर्णय घेणार : वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील

गठीत समिती आठवडयाभरात शासनास अहवाल सादर करणार : पालकमंत्री दादाजी भुसे

0 0 9 8 4 5

मालेगाव (प्रतिनिधी) : देशात शेतीनंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती यंत्रमाग व्यवसायाच्या माध्यमातून होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रमागधारकांना, वस्त्रोद्योग व्यवसायाला व लघुउद्योगाला उभारी देण्यासाठी समितीच्या अहवालाच्या माध्यमातून शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

आज मालेगाव येथे विविध यंत्रमाग कारखान्यास भेट व यंत्रमागधारकांच्या विविध समस्यांबाबत बैठक डायमंड लाँन्स येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद, मुंबई वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दिपक खांडेकर, नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तलयाचे सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) गणेश वंडकर, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या., मुंबईचे प्रशासकीय अधिकारी विजय पुजारी, वस्त्रनिर्माण निरीक्षक गजानान पात्रे, लेखाधिकारी ज्ञानेश्वर टिके, तांत्रिक सहाय्यक एस.बी. बर्मा, यंत्रमाग संघटनेचे चेअरमन साजिद अन्सारी यांच्यासह पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते.

वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनस्तरावर एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. यानुसार वस्त्राद्योग धोरणात आवश्‍यक असलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्याअनुषंगान वस्त्रोद्योग विकासाला चालना देण्यासाठी यंत्रमाग व्यवसाय व त्यासंबंधित काम करणा-या कामगारांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी यंत्रमागधारकांनी टेक्सटाईल पार्क, यंत्रमाग उद्योगांना कामगार सबसिडी, वीज व वीजमीटर समस्या, कामगारांच्या समस्या यासह सर्व वस्त्रोद्योग घटकांसंबंधी समस्या वस्त्रोद्योगमंत्री श्री. पाटील यांच्याकडे मांडली. त्याअनुषंगाने यंत्रमागधारकांनी मांडलेल्या यंत्रमाग व्यवसायासंदर्भात विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वस्त्रोद्योगमंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच वीज सवलत मान्य करण्यात आली असून यंत्रमागधारकांना कच्चा माल योग्य दरात मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत, असेही वस्त्रोद्योगमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, नोंदणीकृत कामगारांना पेन्शन देण्याचे नियोजन आहे. तसेच आनंदाचा शिधासोबत साडीही देण्याचे नियोजन आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील मुलींना मेडीकल, इंजिनिअरींग, लॉ, पॉलीटेक्नीक ,एमबीए सहीत कोणत्याही कोर्ससाठी माहे जूनपासून फी भरावी लागणार नसल्याचे यावेळी सांगितले.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मालेगाव हे यंत्रमागधारकांचे शहर आहे. या यंत्रमाग व्यवसायाच्या माध्यमातून कामगारांचा उदरनिर्वाह होतो. त्याअनुषंगाने यंत्रमागधारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील हे मालेगाव शहरात आले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच यंत्रमागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या असून समितीच्या माध्यमातून अहवाल आठवडयाभरात शासनास सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद म्हणाले, शासनाने यंत्रमागधारकांच्या हितासाठी समितीच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच यंत्रमागधारकांच्या समस्या प्रत्यक्ष येवून जाणून घेतल्या याबद्दल वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 9 8 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे