आरोग्य व शिक्षणस्थानिक
भाषेचा ऱ्हास होताना संस्कृतीचाही ऱ्हास होतो : कवी रतन पिंगट
येवला कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : भाषा मागे पडते तेव्हा एक मानवी समूह देखील मागे पडत असतो. भाषेचा ऱ्हास होताना संस्कृतीचाही ऱ्हास होतो असे प्रतिपादन कवी रतन पिंगट यांनी केले.
येवला कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी पिंगट बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
आपल्या भाषेचा अभिमान बाळगताना दुसऱ्या भाषेचा द्वेष करता कामा नये. जिथे गरज आहे तिथे आपण मराठीत संवाद साधायला हवा. मराठी भाषा ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून भारतात बोलली जाणारी ती तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषा गौरव दिनालाच राजभाषा दिन संबोधले जाते आहे. हे चुकीचे असून राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन वेगवेगळे आहेत असेही कवी पिंगट म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या निवडक कवितांचे वाचनही केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गमे म्हणाले की, मराठी ही आपली मातृभाषा आहे ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. मराठीला मोठी परंपरा आहे. तिचे प्राचीनत्व लक्षात घेता लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी खात्री वाटते. ज्या भाषेतून चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतानी साहित्य निर्माण केले. लोकप्रबोधन केले. जगाला मानवतेचे तत्वज्ञान दिले त्या भाषेचे संवर्धन करणे, जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. मराठी भाषाविषयक विविध उपक्रम राबविले पाहिजे, मराठी साहित्य निर्मिती, भाषा साहित्याचा अभ्यास व संशोधन आदी गोष्टी केल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.
मंचावर उपप्राचार्य प्रा. शिवाजी गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार प्रा. कैलास चौधरी यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
9
8
4
4