
येवला (प्रतिनिधी) : शहरातील मेन रोड वरील पारख क्लॉथ स्टोअर या कापड दुकानास रात्री, (दि. १५) ११.३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याने लाखो रुपयांची वित्त हानी झाली. दरम्यान, या आगीत दुकानात झोपलेल्या तीन कारागिरांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
येवला शहरात मेन रोडवर कापड बाजार आहे. कापड बाजारातील पारख क्लॉथ सेंटर दुकान रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक बंद करून घरी गेले. रात्री, साडेअकरा वाजेच्या सुमारास पारख क्लॉथ सेंटर या दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना नागरिकांना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. घटनास्थळी येवला नगर पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. तर मनमाड व कोपरगाव येथील अग्निशमन दलांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
घटनास्थळी तहसीलदार आबा महाजन यांचेसह स्थानिक अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.