ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

नाशिक, (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमिवर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी दि. 16 मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या अनुषंगाने निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी अभिप्रेत किंवा मोजलेली कोणतीही बाब या प्रसारमाध्यमांशी संबंधित बाबीखाली कलम 126 (1) (ख) नुसार कोणत्याही व्यक्तिने मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान पूर्ण होण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेने संपणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत कोणत्याही मतदान क्षेत्रात सिनेमॅटोग्राफी, दूरचित्रवाणी किंवा तत्सम उपकरणांद्वारे कोणतीही निवडणूकविषयक माहिती जनतेसमोर प्रदर्शित करू नये,
ज्या जनमत कलचाचण्यांचा समावेश असेल, त्याबाबत सार्वजनिक निवडणुकीच्या संबंधात मतदान पूर्ण होण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेने संपणाऱ्या 48 तासांच्या कालावधीत कोणत्याही जनमत कलचाचणीच्या किंवा इतर कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालांसह कोणतीही निवडणूकविषयक माहिती कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 126 क अन्वये, कोणतीही व्यक्ती मतदानाच्या पहिल्या दिवशी मतदानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या सुरवातीपासून ते सर्व राज्ये, संघशासित प्रदेशांमध्ये मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत सुरू असलेल्या कालावधीत इतर कोणत्याही रीतीने मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानोत्तर कलचाचणी घेणार नाही आणि तिचा निकाल मग तो कोणताही असला तरी तो प्रकाशित किंवा प्रसारित करणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.