
येवला (प्रतिनिधी) : येवला शहरातील विंचूर चौफुली येथे होणारे अपघात टाळण्यासाठी याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या सिग्नल यंत्रणेची पाहणी केली. यावेळी येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी सूचना छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या.
यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, गोरख शिंदे, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, मलिक मेंबर, विजय जेजुरकर, संतोष राऊळ, गोटू मांजरे, सुमित थोरात, विकी बिवाल, विशाल परदेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सिग्नल यंत्रणेची नागरिकांना सवय लागण्यासाठी पोलिसांनी जनजागृती करावी. तसेच या ठिकाणी सिग्नल यंत्रणेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. सिग्नल यंत्रणेचे नियम पाळले जात नसतील तर संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस विभागाला दिल्या.
येवला शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित शिवसृष्टी प्रकल्प येवल्यामध्ये साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.