राहाडी विद्यालयात फिरती प्रयोगशाळा उपक्रम

येवला (प्रतिनिधी) : जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित राहाडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व एल. जी. इलेक्ट्रिक यांच्या संयुक्त विद्यमानाने फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम संपन्न झाला.
विद्यार्थीमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी हा या मागील हेतू लक्षात घेवुन विद्यार्थी सहभागाने विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले. तसेच पुणे विद्यापीठाचे कर्मचारी यांनी विज्ञान नाटिकेचे सादरीकरण केले. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण पैठणकर, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गोरख कुळधर, शिक्षक दत्तू जेजुरकर, संजय जेजुरकर, भारम शाळेतील शिक्षक रवी सोनवणे, संतोष इंग्लिश मीडियमचे प्राचार्य हारून शेख आदी उपस्थित होते.
फिरती प्रयोगशाळा बघण्यासाठी परिसरातील भारम, खरवंडी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठातील कर्मचारी श्री. नंदराज कोळेकर, श्री. सीताराम बहिर, श्री. राहुल जगताप, श्री. गणेश सोनवणे, श्री. रविंद्र मगर, श्री. सोमनाथ मुर्तडक यांचा शाळेच्या वतीने प्राचार्य श्री. पैठणकर यांनी सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शाळेतील कर्मचारी, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व बीएड विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.