येवल्यात निमंत्रित कवी गायकांचे लोक प्रबोधन काव्य-गीत संमेलन उत्साहात संपन्न
हे धर्मांच्या आंधळ्यांनो, हे मताचे युद्ध आहे...

येवला (प्रतिनिधी) : भारतीय निवडणूक आयोग स्थापना दिन मतदारदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय, राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका, येवला (नाशिक) यांच्या वतीने निमंत्रित कवी गायकांचे लोक प्रबोधन काव्य-गीत संमेलन उत्साहात संपन्न झाले.
स्वरचित, अन्य कवींची सामाजिक प्रबोधनात्मक काव्य-गीत सादरीकरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकवी इकरानाज अजहर शाह होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. जिभाऊ मोरे, अजीजभाई शेख, अजहर शाह, विकास वाहुळ, डॉ. भाऊसाहेब केदारे, सुरेश खळे, तात्यासाहेब गायकवाड उपस्थित होते.
शिर्डी येथील युवा कवी साथी आकाश खंडागळे यांनी वर्तमान स्थितीवरील,
कोण इथे शुद्ध आहे
कोण इथे बुद्ध आहे
शांततेने मारण्याचे
हे नवे युद्ध आहे
सांगा कुठे राम तुमचा
सांगा कुठे रहीम आहे
हे धर्माच्या आंधळ्यानो
हे मतांचे युद्ध आहे
उभा सारा देश आमचा
सांगावया तरुण आहे
चालवणारे राज्य इथले
सारे सारे वृद्ध आहे, हि कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.
कोपरगाव येथील गायिका आरती खरात यांनी स्त्री भ्रूण हत्या या विषयावर आपली रचना, पोटात धरपडता- धरपडता गुंतला होता फासा। कळत मला नव्हते मी जन्म घेऊ कसा।। सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे ओळख करून देणारे, आता झुकणार नाही, हार मानणार नाही। असं मैदानी उतरू खंबीर, आता एक एक पोरगं साहेब झालं बाबासाहेबांच्या पुण्याईनं।। हे गीत सादर केले.
लासलगाव येथील युवा कवी अभिषेक गांगुर्डे यांनी शेतकरी-कामगार यांच्या व्यथा वेदना मांडणारे शेर व कविता सादर केल्या. कवी राजरत्न वाहुळ, अश्विनी सांगळे, पूजा सांगळे, शायर अजीजभाई शेख, ॲड.चंद्रकांत निकम, मुझम्मील असदुल्लाह चौधरी, शरद शेजवळ यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांचे वादळाचा वार हो, पाऊसाची धार हो, फोड बांध बांधाच्या पार हो, राहू नको आज तरी थंड तू, आज तरी हो भिमाचे बंड तू, लेखणी तलवारीची धार हो, हो नवा अंगावर हो, आज तरी मुक्तीचे द्वार हो हे गीत सादर केले. सामाजिक प्रबोधन विषयावरील आपल्या एकापेक्षा एक सरस अशा रचना सादर करून संमेलन रंगतदार केले.
संमेलनाच्या अध्यक्षा इकरा शहा यांनी आपली रचना,
संविधान संविधान तुम हो हमारे अभियान। तुम ही पर चलता है सारा हिंदुस्तान।। नफरत भाईचारे के नाम पर हम कर रहे हैं लड़ाई। क्यों भूल जाते हो तुम के हम सब है भाई भाई।। हि रचना सादर केली.
संमेलनाचे प्रास्ताविक मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले. सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ तर आभार शैलेंद्र वाघ यांनी मानले. संमेलनाचे संयोजन सुरेश खळे, प्रकाश वाघ, गौतम पगारे, सुभाष गांगुर्डे, रमेश गायकवाड, रंजित संसारे, शैलेंद्र वाघ, सुभाष वाघेरे, विश्वास जाधव, अशोक पगारेसर, बी.डी.खैरनार, अक्षय गरुड, ललित भांबेरे यांनी केले.