बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांची राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेस निवड
येवला (प्रतिनिधी) : क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय क्रीडा स्पर्धेत येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक संचलित बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरीय स्पर्धेत नैपुण्य दाखवत बाजी मारली.
विभागीयस्तरीय थांग ता मार्शल आर्ट या स्पर्धेचे नंदूरबार येथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत विविध गटात 120 खेळाडू सहभागी झाले होते. यात अगदी चुरशीच्या सामन्यात बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या अंशुनी सागर चव्हाण हिने १७ वर्षातील मुलींमधील गटातून ४४ ते ५५ वजनगटात प्रथम तर आरव धर्मराज अलगट याने १४ वर्षातील मुले गटातून ४४ ते ५५ वजनगटात प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सागर रोकडे व दिपक देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ सहकार नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, अध्यक्ष प्रवीण बनकर, सचिव माधव बनकर व शाळेचे प्राचार्य पंकज निकम यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.