स्थानिक
येवला महाविद्यालयाला नॅक ची बी+ श्रेणी

0
0
9
8
4
7
येवला (प्रतिनिधी) : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाला मागील पाच वर्षातील ऑनलाईन स्वयं अध्ययन अहवाल (सेल्फ स्टडी रिपोर्ट) व नॅक समितीने दिलेल्या प्रत्यक्ष भेटीच्या अहवालावरून नॅक ची ‘B+’ ग्रेड दिल्याचे पत्र नुकतेच ईमेलद्वारे महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.
नुकतीच बंगलोर येथील नॅक तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक सिंग, (कुलगुरू संत गहीरा गुरु विद्यापीठ सारगुजा, अंबिका पूर छत्तीसगड), डॉ. दूर्गाराव सोदेन (पूर्व प्राध्यापक श्री व्यंकटेश्वरा विद्यापीठ तिरुपती), डॉ. सरिता बहेल, (प्राचार्य देवकी देवी जैन मेमोरिअल महिला महाविद्यालय लुधियाना, पंजाब) यांच्या त्रि-सदस्यीय समितीने भेट दिली होती. यावेळी त्यांनी महाविद्यालय व्यवस्थापन समिती, महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक वृंद तसेच आजी-माजी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. महाविद्यालयातील सर्व विभागांतील शैक्षणिक व सहशैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला होता. येवला महाविद्यालय हे ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट महाविद्यालय आहे असे मत व्यक्त करताना विद्यार्थ्यांशी बांधिलकी असणारे प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापक वर्गाच्या कार्याची नॅक समितीने प्रशंसा केली. महाविद्यालयात होत असलेल्या सुधारणा, अध्ययन-अध्यापन कार्य व संशोधन याविषयीही समाधान व्यक्त केले. त्यासोबतच काळानुसार महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम्स, डिजिटल लायब्ररी व पदव्युत्तर वर्गांची संख्या वाढविण्याविषयी व इमारतीच्या विस्तारीकरणाविषयी सूचनाही समितीने महाविद्यालय प्रशासनाला दिल्या.
महाविद्यालयाला नॅक ची ‘B+’ ग्रेड मिळाल्याने प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी समाधान व्यक्त केले. अनेक महाविद्यालयांची कोरोनाकाळाच्या परिणामाने ग्रेड मध्ये घसरण होत असताना येवला महाविद्यालय आपली B+ ही ग्रेड टिकविण्यात यशस्वी झाले आहे. इतकेच नाही तर मागील CGPA 2.62 वरून 2.67 अशी CGPA मध्ये वाढ झालेली असल्याने महाविद्यालयाच्या यशाचा आलेख उंचावत असल्याचे ते म्हणाले. या यशाचे श्रेय संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, महाविद्यालय विकास समिती, प्रशासन व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे असल्याचे ते म्हणाले. येवला महाविद्यालयास पुढील काळात B++ व A ग्रेड मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
0
0
9
8
4
7