थंडीच्या तीव्रतेत होणार वाढ; रब्बी पिकांना फायदा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यासह देशातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. आता मात्र, थंडीचा जोर वाढत असल्याने रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मंगळवार, (दि. २६) पासून देशातील विविध राज्यांमधील किमान तापमान पुन्हा एकदा कमी होणार आहे. परिणामी पुन्हा एकदा थंडीच्या तीव्रतेमध्ये वाढ होईल अशी आशा आहे. एकीकडे देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये थंडीची लाट आली आहे तर दुसरीकडे देशाच्या दक्षिण भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. येत्या काही दिवसात तामिळनाडू मध्ये विशेषता किनारपट्टी भागात मध्यम ते हलका पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
३० डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे. त्यासोबतच २७ आणि २८ डिसेंबरला तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये सुद्धा काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल असे सांगितले गेले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. तर राज्यात थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.