रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करत शेतकऱ्याची दोन लाखांची रोकड घेवून चोरटे फरार

येवला (प्रतिनिधी) : रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करत शेतकऱ्याची दोन लाखांची रोकड घेवून चोरटे फरार झाल्याची घटना तालुक्यातील अंदरसुल येथे घडली आहे.
शेतकरी सोमनाथ इंद्रभान कुऱ्हे रा. पिंपळखुटे यांनी आपली मका विकून मिळालेले दोन लाख पाच हजार रुपये येवल्यातील बँकेतून काढून आपल्या घरी जात होते. अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई सोनवणे स्कूल समोरील पुलावर पाठीमागून आलेल्या दोघा चोरट्यांनी तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहे अशी बतावणी केली असता पाहण्यासाठी आपले वाहन उभे केले. यावेळी दोघा अज्ञात चोरट्यांनी नजर चुकून शेतकऱ्यांच्या ताब्यातील दोन लाख पाच हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला.
दरम्यान, या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. टोल नाक्यावरील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.