गरजू पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून घरकुलांचा लाभ मिळवून द्या ; मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकल्प संचालकांना सूचना

येवला (प्रतिनिधी) : येवला मतदारसंघातील सर्वेक्षण करून पात्र व गरजू बेघर लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच एकही गरजू घरकुलापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत.
शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ गरजू पात्र लाभार्थ्यांना देण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मतदारसंघाचा दौरा करतांना व विविध गावांना भेटी देताना अनेक गरजू व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही असे निदर्शनास आले आहे. सर्वांसाठी घरकुल योजना असे शासनाचे धोरण असतांनाही अशा बाबी निदर्शनास येत आहेत. शासनाने अनुसूचित जातींसाठी रमाई आवास योजना, अनुसूचित जमातींसाठी शबरी आवास योजना, इतर मागासवर्ग व भटक्या विमुक्तांसाठी मोदी आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना व इतर आवास योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
शासनाच्या या घरकुल योजनांचा लाभ मिळण्यासाठी येवला मतदारसंघातील प्रत्येक गावातून सर्वेक्षण करून पात्र व गरजू बेघर लाभार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुले मंजुरीसाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना त्यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.