नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या फरक बिल प्रश्नी आमदार दराडेंनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
चौकशीची मागणी करत सर्व शिक्षकांची फरक बिले जमा करण्याची केली सूचना

नाशिक (प्रतिनिधी) : २०१८ पासून जिल्ह्यातील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची फरकाची बिले रखडलेली आहेत. सध्या माध्यमिक शिक्षण विभाग वेतन पथकामार्फत ही बिले जमा करण्याची कामे सुरू आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू असून अनेक शिक्षकांची बिले जमाच करून घेतली गेली नाही. त्यामुळे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी नाशिक येथे अधिकाऱ्यांना जाब विचारत फरक बिले वाटपाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्व शिक्षकांची बिले जमा करून घ्या तसेच कुठलाही दुजाभाव न करता प्रतीक्षा यादीप्रमाणे बिले अदा करा अशा सूचनाही आमदार दराडे यांनी यावेळी दिल्या.
नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची विविध प्रकारची फरक बिले मंजुरीची प्रक्रिया शिक्षण विभाग व वेतन पथकाच्या मार्फत सुरू आहे. सदरची प्रक्रिया अतिशय गोंधळात सुरू असल्याने शिक्षकांना हेलपाटे मारावे लागत असून शिक्षण विभागाने पाठवलेल्या पीडीएफमध्ये शिक्षकांची नावे असूनही सदरची बिले जमा करून घेतली गेली नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व सर्व संघटनांचे पदाधिकारी यांची नाशिक येथे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील तसेच वेतन अधिक्षक नितीन पाटील, माध्यमिकचे अधिक्षक सुधीर पगार यांच्या उपस्थितीत शिक्षक आमदार दराडे यांनी बैठक घेतली. यावेळी दराडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरले. ठराविक बिलेच काढणार, हे काढणार, ते काढणार नाही…असे सांगत बाकीची बिले परत पाठविण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी असा संतप्त सवाल आमदार दराडे यांनी केला.
यावेळी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे, डॉ. अनिल माळी, भागीनाथ घोटेकर, सचिन पगार, एनडीएसटीचे चेअरमन मोहन चकोर, दत्तात्रय सांगळे, चंद्रशेखर सावंत , रेखा धात्रक, विना काळे, सिमा देवरे, जयश्री देवढे, दीपमाला झाडे, प्रशंत इप्पर, कृष्णा जाधव, केशव खताळे, सुनिल काळे, भाविक पटेल, मिलींद टीके, स्वीय सहाय्यक हरिष मुंढे आदींसह शंभरावर शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील यावेळी आपल्या समस्या मांडल्या. त्या सोडवण्याच्या सूचना आमदार दराडे यांनी दिल्या.
यावेळी बैठकीत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची, सर्व प्रकारची बिले तातडीने वेतन पथक कार्यालयाने जमा करून घ्यावी अशा सूचना दिल्या. फरक बिलांसाठी निधी उपलब्ध असल्याने २०१८ ते २०२२ या काळातील पात्र असलेली सर्व बिले वर्षानिहाय व प्रतिक्षा यादीनुसार काढावी, त्यात कुठलाही दुजाभाव करू नये. तसेच तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याने त्यांच्या काळातील काळातील ६१५ शिक्षकांची बिले मंजूर करण्यासाठी तातडीने मंजुरीचा प्रस्ताव बनवून तो शासनाकडे पाठवावा, मंत्रालय पातळीवर मंजुरीसाठी मी पाठपुरावा करील असेही आमदार दराडे यांनी यावेळी सांगितले.
वेतन पथक कार्यालयात तेथील कर्मचारी सोडुन बाहेरचा एकही लिपीक असता कामा नये, प्रतिक्षा यादी प्रमाणेच फरक बीले काढवीत, शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व बीले नियमाप्रमाणे काढली किंवा नाही याची चौकशी करावी आशा सूचना आमदार दराडे यांनी दिल्या. प्रास्तविक एस. बी. देशमुख यांनी केले. तर आभार प्रदिप सांगळे यांनी मानले.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना नियमाने मिळणार असतो. त्यातही मागील पाच वर्षापासून सर्व बिले रखडली आहेत, आता शिक्षण विभागाकडे हट्ट धरून जिल्ह्यासाठी निधी मिळवला आहे. हक्काच्या बिलांसाठी शिक्षकांची होणारी फरपट व गैरसोय चुकीची आहे. शिक्षकांच्या तक्रारी आल्याने बैठक घेऊन विचारणा केली. नियमानुसार व प्रतीक्षा यादीप्रमाणे शिक्षकांना आपली बिले मिळालीच पाहिजे यात गैरप्रकार झाल्यास आंदोलन उभारू.
– किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग