आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
शासनाने नवीन संच मान्यता धोरण त्वरित रद्द करावे
कास्ट्राईब जिल्हा अध्यक्ष गोकुळदास वाघ यांची मागणी

0
0
9
8
4
4
येवला (प्रतिनिधी) : नवीन संच मान्यतेनुसार शाळा शिक्षक व विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून नवीन भरती प्रक्रिया देखील ठप्प होणार आहे. त्यामुळे शासनाने नवीन संच मान्यता धोरण त्वरित रद्द करावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षण संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गोकुळदास वाघ यांनी केले आहे.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना, नवीन संच मान्यतेचा फेरविचार करावा असे निवेदन दिले आहे.
शालेय शिक्षण विभागाने नुकतेच संच मान्यतेचे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून या निर्णयाने शिक्षण क्षेत्र मोठ्या अडचणीत सापडणार आहे. दरवर्षी संच मान्यतेनुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांची पदे निश्चित केली जातात यापूर्वी पहिली ते पाचवीसाठी 60 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक तर 61 पटाच्या पुढे विद्यार्थी संख्या गेल्यास तिसरा शिक्षक मिळत होता. परंतु नवीन संच मान्यतेनुसार शाळेचा पट 76 च्या पुढे गेल्यासच तिसरा शिक्षक मिळणार आहे. यामुळे अगोदरच शिक्षक संख्या कमी असताना शासनाने नवीन संच मान्यता धोरण स्वीकारल्याने आता ग्रामीण भागात दुर्गम भागात वाड्यावस्त्यांवर शिक्षकाची पदे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
तसेच दोन शिक्षक कार्यरत होते परंतु नवीन संच मान्यतेनुसार आता व्दि शिक्षकी शाळेत एक नियमित शिक्षक तर दुसरा शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक अशी पदे मंजूर होणार आहेत. सहावी ते आठवी पर्यंत 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मिळायचा तर 36 विद्यार्थ्यांचे मागे दोन शिक्षक दिले जात होते परंतु आता नवीन संच मान्यतेनुसार 53 पटानंतर दुसरा शिक्षक मिळणार आहे. तर पूर्वी 151 पटावर मुख्याध्यापक पद मंजूर होत असे आता मात्र 166 विद्यार्थी असतील तरच मुख्याध्यापक पद मंजूर होणार आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेले संच मान्यतेचे नवीन निकष हे शाळा विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अन्यायकारक असून नवीन भरती वर देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रण येणार असून शासनाने या निर्णयाकडे गांभीर्याने पाहून नवीन शैक्षणिक संच मान्यता धोरण रद्द करावे, असे सदर निवेनात वाघ यांनी म्हटले आहे.
0
0
9
8
4
4