वसंत व्याख्यानामालेच्या 101व्या वर्षाच्या ज्ञानयज्ञाचा उद्या शुभारंभ
जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य यांचा नागरी सत्कार

नाशिक (प्रतिनिधी) : भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या आणि लोकल ते ग्लोबल अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेल्या वसंत व्याख्यानामालेच्या 101व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचा शुभारंभ बुधवार, दि. १ मे पासून होणार आहे.
दि. 1 ते 31 मे 2024 रोजी दररोज सायं 7:15 वाजता देवामामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर व केबल नेटवर्कवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
व्याख्यानमालेचा शुभारंभ चित्रकूट येथील दिव्यांग विद्यापीठाचे कुलपती पदमविभूषण जगतगुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्या व्याख्यानाने होणार आहे. रामराज्याची संकल्पना या विषयावर ते बोलणार आहेत.
स्वामी रामभद्राचार्य यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. पिंप्री येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे.
मालेच्या 101 व्या वर्षाच्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठ मंडळ, नवी दिल्लीचे महाप्रबंधक आर. एन. तिवारी, महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. आशिमा मित्तल, आदिवासी विकास आयुक्त सौ. नयना गुंडे, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती लीना बनसोड, HAL चे महाव्यवस्थापक सुब्रत मंडल, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक सौ. शर्मिष्ठा वालावलकर उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या व्याख्यानमालेत जगभरातील विविध देशांमध्ये विविध विषयांत अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या 10 तज्ञ मराठी व्यक्तिमत्वांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्त तरुणांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. त्याचबरोबर समाजसेवक प्रकाश आमटे, शमसुद्दीन तांबोळी, सुप्रसिद्ध विधिज्ञ श्रीहरी अणे, सुधाकर आव्हाड, पद्मभूषण डॉ. एम. एस. लाड, डॉ. ओमप्रकाश शेटे, शेतीतज्ज्ञ विलास शिंदे, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र कांगो, ज्येष्ठ साहित्यिक भगवान इंगळे, ब्रम्हकुमार डॉ. प्रेम मसंद आदी मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत. दि. 9 मे रोजी जम्मू काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आमिर हुसेन लोन यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध क्रीडा समीक्षक नितीन मुजुमदार आमिरची मुलाखत घेणार आहे. वयाच्या आठव्या वर्षी एका अपघातात दोन्ही हात गमावल्या नंतरही खचून न जाता मान व खांदा यांच्यात बॅट पकडून तर पायाने बॉलिंग व फिल्डिंग करण्याचे कसब आमिर याने मिळविले व क्रिकेट क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रशंसनेस आमिर पात्र ठरल्याने त्याला इंडियन स्ट्रीट क्रिकेट लीग मध्ये खेळण्याची संधी मिळाली.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा दररोजच्या व्याख्यानानंतर नाशिक मधील गायक-गायिका अविस्मरणीय व कर्णमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. 28 दिवसात 116 गायक-गायिका या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी दि. 31 मे रोजी झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा भव्यदिव्य कार्यक्रम सादर होणार आहे. झी मराठी वाहिनीच्या मालिकांमधील कलाकार, सारेगमप मधील गायक, सेलिब्रिटी निवेदक, नृत्य कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन व्याख्यान मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी व कार्यकारी मंडळाने केले आहे.
भव्य व्यासपीठाची उभारणी
व्याख्यानमालेकरिता गोदघाटावर 12*32 फूट आकाराचे भव्य व्यासपीठ नेपथ्यकार शाम लोंढे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत आहे. व्यासपीठावर 8*10 फूट आकाराची भव्य LED वॉल लावण्यात येणार आहे.
स्वामी रामभद्राचार्य यांचा परिचय
या वर्षीचा भारताचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळविणारे स्वामी रामभद्राचार्य हे एक बहुआयामी विद्वान आहेत. ते भारतातील चित्रकूट येथील भारतीय हिंदू अध्यात्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ, संस्कृत विद्वान, बहुभाषिक, कवी, लेखक, भाष्यकार, तत्त्वज्ञ, संगीतकार आहेत. त्याचबरोबर ते एक गायक, नाटककार आणि कथा कलाकार सुद्धा आहेत. दृष्टिहीन असूनही स्वामीजींनी एवढी मोठी उंची गाठली आहे.
हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की जुलै 2003 मध्ये रामभद्राचार्य यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात रामजन्मभूमी बाबरी मशीद विवाद प्रकरणात धार्मिक बाबींसाठी तज्ञ साक्षीदार म्हणून एक महत्वाची साक्ष दिली. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील काही भाग आणि त्याची उलट तपासणी उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निकालात उद्धृत केली गेली आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात, त्यांनी रामायण, रामतापणीय उपनिषद, स्कंद पुराण, यजुर्वेद, अथर्ववेद आणि इतरांसह प्राचीन हिंदू धर्मग्रंथांचा आधार घेत अयोध्या हे रामाचे जन्मस्थान आणि हिंदूंसाठी एक पवित्र शहर आहे हे पुराव्यासह मांडले.
स्वामी रामभद्राचार्य 22 भाषा बोलू शकतात आणि ते संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली आणि इतर अनेक भाषांमधील उत्स्फूर्त शीघ्रकवी आणि लेखक आहेत. त्यांनी 240 हून अधिक पुस्तके आणि 50 शोधनिबंधांचे लेखन केले आहे, ज्यात चार महाकाव्ये, तुलसीदासांच्या रामचरितमानस आणि हनुमान चालिसा वरील हिंदी भाष्य, अष्टाध्यायीवरील श्लोकातील संस्कृत भाष्य आणि प्रस्थानत्रयी शास्त्रावरील संस्कृत भाष्ये यांचा समावेश आहे. संस्कृत व्याकरण, न्याय आणि वेदांत यासह विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रचंड व्यासंग आणि ज्ञानासाठी स्वामीजींची कीर्ती आहे. ते भारतातील तुलसीदासांच्या साहित्यावरील श्रेष्ठ अभ्यासकांपैकी एक मानले जातात आणि ते रामचरितमानसच्या चिकित्सक आवृत्तीचे संपादक आहेत.