Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरप्रासंगिकराजकियस्थानिक

येवला शहर समस्यामुक्त व्हावे हीच अपेक्षा

रंग येवल्याचे / योगेंद्र वाघ

0 1 1 1 5 9

येवला शहरातील रस्ते, स्वच्छता, गटारी, पाणी आदी मुलभूत प्रश्‍न सध्या ऐरणीवर आले आहेत. दैनंदिन व शहरवासीय सर्वसामान्य जनतेच्या या मूलभूत प्रश्‍नांवर सोशल माध्यमातून चर्चा झडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) आक्रमक झाली. गेल्या आठवड्यात ‘देशदूत’ने या सार्‍या समस्यांचा उहापोह करत “जनउद्रेकाआधी प्रशासनाने कार्यतत्पर व्हावे”, या मथळ्याखाली स्पष्टपणे सविस्तर मांडले होते. याची दखल घेत येवला दौर्‍यावर आलेल्या राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ताफा बाजूला सारून स्वत: समस्याग्रस्त भागात जावून पाहणी केली व तातडीने समस्या सोडविण्याच्या सूचना संबंधीत अधिकारी वर्गाला केल्या.

शहरातील अस्वच्छता, होणारा दूषित पाणीपुरवठा, खराब रस्ते या संदर्भाने शहरातील विविध भागातील नागरीक व कार्यकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी, समस्यांसंदर्भात माजी नगराध्यक्षा उषाताई शिंदे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) शहराध्यक्ष योगेश सोनवणे आणि पदाधिकारी निवेदन देण्यासाठी पालिका कार्यालयात गेले. मुख्याधिकारी यांचे गैरहजेरीत उपमुख्याधिकारी भोये यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी विविध विभागातील संबंधीत अधिकार्‍यांना आपल्या कक्षात बोलवून त्वरित निवेदनावर कारवाई करावी अशी, विनंती केली गेली. स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा प्रश्न उपस्थित झाला असता बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र सुतावणे यांना बोलवण्यात आले. परंतु समस्या ऐकण्याच्या आधीच उडवाउडवीचे उत्तर देत सुताने हे, मी मिटींगला थांबणार नाही असे म्हणत निघून गेले. उपमुख्याधिकारी यांनी केलेल्या विनंतीलाही त्यांनी मान दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) पक्षाने या प्रकाराचा जाहिर निषेध केला. मात्र इतकी मुजोरी अधिकारी वर्गात आली कुठून असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, निवेदनात नोंद असलेली सर्व कामे येत्या दहा दिवसात मार्गी लावतो असे अश्‍वासन उपमुख्याधिकारी भोये यांनी यावेळी दिले. शहरातील मध्यवस्तीत असणार्‍या जुन्या नगरपालिकेची वास्तू पाडण्यात येत असल्याने तेथे आपण काय करणार आहात या प्रश्नावर तेथे शॉपिंग सेंटरचा नवीन प्रोजेक्ट होणार असल्याचे उपमुख्याधिकारी भोये यांनी सांगीतले. यावर जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून तयार आहेत, त्यांचेच लिलाव अजून झाले नाही तर नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स कशासाठी असा सवाल करत, या जागेवर नगरपालिकेचे तक्रार निवारण केंद्र किंवा वसुलीचे कार्यालय, जनतेसाठी पार्किंग, सुलभ सौचालय आदी व्यवस्था कराव्यात अशी लेखी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) पक्षाच्या वतीने करण्यात आली.

मंत्री भुजबळ यांच्या येवला येथील संपर्क कार्यालयात दर आठवड्याला (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे मंत्री भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकांसह अधिकारी, पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेत असतात. मंत्री भुजबळ यांच्या सूचनेवरूनच हा शिरस्ता सुरू आहे. नुकत्याच झालेल्या या आढावा बैठकीतही, शहरातील कॉलनी भागात कुठेही चिखल होऊ देऊ नका, शहा कॉलनी गटार लवकर करा, मोरे वस्ती येथील खंदून ठेवलेला रस्ता लवकर दुरूस्त करा यासह शहरातील व ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत खैरे यांनी संबंधीत अधिकार्‍यांना आदेश देत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. हे सांगतांना मंत्री भुजबळ शनिवारी येवला दौर्‍यावर येणार असून यावेळी यासर्व कामांची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

कोणत्याही व कोणाच्याही माध्यमातून का होईना येवल्यातील जनसामान्यांच्या समस्या मंत्री भुजबळ यांचे पर्यंत पोहचल्या. स्वत: मंत्री भुजबळ यांनी पाहणी केली आणि जागेवरच संबंधीत अधिकार्‍यांची झाडाझडती घेत समस्या सोडविण्याचे आदेश दिले असल्याने शहरवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर मंत्री भुजबळ यांच्या गैरहजेरीत खैरे यांनीही शहर समस्यांवर लक्ष केंद्रीत केले असल्याने लवकरच शहर समस्यामुक्त व्हावे, हीच अपेक्षा! याबरोबरच गेल्या पंधरा – सोळा वर्षांपासून रखडलेला व्यापारी संकुलाचा प्रश्‍न आता मार्गी लागण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. नुकतेच सि.स.नं. 3807 आ. क्र. 36 व्यवसायीक दुकान केंद्रातील 102 गाळ्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची जाहीर सूचना नगरपालिकेच्या वतीने प्रसिध्द करण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीत विस्थापितांना, त्यांचे कुटुंबांना प्राधान्याने न्याय मिळावा, अशी सर्वसामान्य येवलेकरांची अपेक्षा आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 1 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे