
येवला (प्रतिनिधी) : शहरातील नगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे प्राधान्याने विस्थापित गाळेधारकांना देवून त्यांचे पुनर्वसन करा, ई लिलाव ऐवजी विस्थापितांना संधी द्या, या मागणीसाठी विस्थपित गाळेधारकांनी शहरातील विंचूर चौफुली येथे अभूतपूर्व चक्का जाम आंदोलन केले. भर पावसात सुमारे साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे मालेगाव – पुणे, नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर वाहनांच्या चारही बाजूने दहा ते पंधरा कि.मी. लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
- —————————————————–
- पावसाच्या सरी सुरू असतानाही भर पावसात अंदोलकांसह आमदार दराडे बंधू आणि सहभागी राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी रस्त्यावर ठाण मांडून बसून होते. तर चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाही पावसात रस्त्यावर बसायला आंदोलकांनी भाग पाडले.
- अंजनाबाई गोपाळ सावंत या 80 वर्षीय आजीबाई देखील आपल्या नातवाला न्याय मिळावा म्हणून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
- सदर आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरातील व्यापारी वर्गाने सकाळी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती. आंदोलनात विस्थापित बांधवांसाठी व्यापरीवर्गही सहभागी झाला होता.
- आंदोलनामुळे साडेतीन तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सुमारे दोन तास लागले.
- —————————————————–
शुक्रवारी, (दि. २५) सकाळी ११ वाजता शहरातील विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास व दिवंगत विस्थापित गाळेधारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विस्थापित गाळेधारक डोक्यावर “न्याय द्या” असे लिहिलेल्या गांधी टोप्या घालून कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरले. विस्थापित गाळेधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, विस्थापितांचे पुनर्वसन करा, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री आनंद शिंदे, प्रमोद सस्कर, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते किशोर सोनवणे, शहर प्रमुख अतुल घटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे डॉ. संकेत शिंदे, बाजार समिती संचालक सचिन आहेर, रिपाइंचे बाळू कसबे, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय कासार आदींनी बोलतांना, विस्थापित गाळेधारकांना प्राधान्याने गाळे देऊन पुनर्वसन करण्याची मागणी केली. तर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विस्थापितांबरोबर असल्याचे सांगितले.
गाळेधारकांच्या वतीने बोलतांना सोनल परदेशी, सचिन पाटील, बळीराम शिंदे, संदीप दारुंटे यांनी, शासन प्रशासनाने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या विस्थापित गाळेधारकांना आता तरी न्याय द्यावा, अशी मागणी केली. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतांना, हा प्रश्न शासन स्तरावरचा असल्याचे सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासन मिळाल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. शेवटी दराडे बंधूंच्या हस्तक्षेपा नंतर, १५ ऑगस्ट पर्यंत निर्णय होईल असे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, ठोस निर्णय न झाल्यास आत्तापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष मीननाथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) शहराध्यक्ष योगेश सोनवणे, रिपाइं अध्यक्ष गुड्डू जावळे, भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राहुल लोणारी, सुरेश गोंधळी, वसंतराव झांबरे, अरुण काळे, संजय गायकवाड, निरंजन परदेशी, सचिन कासार, सुधीर सोनवणे, गणेश दोडे यांचे सह विस्थापित गाळेधारक, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (शप), शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा), रिपाइं, स्वारिप, प्रहार, व्यापारी महासंघ आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
…तर आमदारकीचा राजीनामा : आमदार दराडे
आमदार किशोर दराडे यांचा रुद्रावतार या आंदोलनात पाहायला मिळाला. अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करताय का ? हे कळत नाही असा सवाल करत, तुम्ही गाळेधारकांच्या आणि आंदोलकांच्या भावना वरिष्ठापर्यंत का पोहोचवत नाही.अठरा वर्षानंतर ही गाळेधारकांना न्याय मिळत नसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तुम्ही फक्त अधिकारी म्हणून येथे दिवस काढण्यासाठी आले आहात का ? मी अनेकदा पत्र दिले, सभागृहातही विषय मांडला तरी तुम्ही वरिष्ठापर्यंत विषय मांडून पाठपुरावा करू शकत नाही अशा शब्दात दराडे यांनी अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली. भूमिपुत्र म्हणून गाळेधारकांना न्याय देऊ शकलो नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.